esakal | यंदाच्‍या अधिकमासाने १६५ वर्षांनंतर झालाय हा बदल
sakal

बोलून बातमी शोधा

adhik mass

गणेशोत्सवानंतर भाद्रपद वद्य (कृष्ण) पक्षात पितृपक्षास प्रारंभ होतो. यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवास सुरवात होते. मात्र, या वर्षी आश्विन महिन्यात अधिकमास आल्यामुळे पंचांगात अधिक आश्विन आणि निज आश्विन असे दोन आश्विन महिने आले आहेत.

यंदाच्‍या अधिकमासाने १६५ वर्षांनंतर झालाय हा बदल

sakal_logo
By
प्रदीप वैद्य

रावेर : या वर्षी भाद्रपदातील सर्वपित्री अमावास्येनंतर अधिक (पुरुषोत्तम) मासास प्रारंभ होत आहे. यामुळे शारदीय नवरात्री उत्सवासह (घटस्थापना) दसरा, दिवाळी तब्बल एक महिना पुढे ढकलली गेली आहे. अधिकमासामुळे १६५ वर्षांनंतर ही स्थिती निर्माण झाली आहे. 

गणेशोत्सवानंतर भाद्रपद वद्य (कृष्ण) पक्षात पितृपक्षास प्रारंभ होतो. यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवास सुरवात होते. मात्र, या वर्षी आश्विन महिन्यात अधिकमास आल्यामुळे पंचांगात अधिक आश्विन आणि निज आश्विन असे दोन आश्विन महिने आले आहेत. पितृपक्षानंतर अधिकमास येत असल्यामुळे या वर्षी एक महिना उशिराने निज आश्विनामध्ये नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. यामुळे नवरात्रोत्सवासह दसरा, कोजागरी पौर्णिमा, दिवाळी एक महिना पुढे ढकलली गेली आहे. 

अधिक मासानंतर असे आहेत उत्‍सव
या वर्षी २ सप्टेंबरपासून पितृपक्षास सुरवात होत आहे. १७ सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्या, १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबरपर्यंत अधिक (पुरुषोत्तम) मास, १७ ऑक्टोबर घटस्थापना (नवरात्री) उत्सव, २५ ऑक्टोबर दसरा, ३० ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा, १४ नोव्हेंबर दिवाळी हे सण- उत्सव एक महिना पुढे लांबले आहेत. आषाढ शुद्ध एकादशी (आषाढी एकादशी) ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चतुर्मासाचा (चार महिन्यांचा) कालावधीही अधिकमासामुळे एक महिना पुढे लांबल्यामुळे यंदा चतुर्मास चार महिन्यांऐवजी पाच महिन्यांचा राहणार आहे. यामुळे २६ नोव्हेंबरला चतुर्मासाची समाप्ती व तुलसी विवाहास प्रारंभ होणार आहे. यामुळे विवाह, शुभकार्य आदी कार्य वर्ज्य मानले गेले आहेत. 

अधिकमासाची निर्मिती 
सूर्य वर्ष ३६५ दिवस व सहा तासांचे असते, तर चंद्र वर्ष ३५४ दिवसांचे मानले जाते. दोन्ही वर्षांच्या अंतरात प्रतिवर्षी अकरा दिवसांचे अंतर असते. यामुळे तीन वर्षांत (३३ दिवस) एक अधिक महिना तयार होतो. हे अंतर कमी करण्यासाठी पुरातन काळापासून तीन वर्षांनी येणारा ते दिवस ‘अधिकमास’ म्हणून हिंदू संस्कृतीत पाळले जातात. या महिन्यास ‘मलमास’ म्हणूनही ओळखले जाते. 

पौराणिक कथा 
हिंदू संस्कृतीत या तेराव्या महिन्यात (मलमासात) आपली पूजा होऊ नये, असे मत देव-देवतांनी व्यक्त केले होते. मात्र, या महिन्याचा श्रीहरी यांनी स्वीकार केला. यामुळे या महिन्यास ‘पुरुषोत्तम मास’ असेही संबोधण्यात येते. यामुळे या महिन्यात भागवत कथा, प्रवचन ऐकण्याचे विशेष महत्त्व आहे. 

दुर्गादेवी मूर्तिकारही संभ्रमात 
दर वर्षी गणेशोत्सवानंतर मूर्तिकार दुर्गादेवीच्या मूर्ती तयार करण्यास प्रारंभ करतात. मात्र, या वर्षी गणेशोत्सवानंतर तब्बल दोन महिन्याने दुर्गा उत्सवाला सुरवात होणार असल्यामुळे तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दुर्गादेवी उत्सवाचे व मूर्तीचे निकष अद्याप शासन, प्रशासनाने न ठरवल्यामुळे मूर्ती किती मोठी बनवायची, याबाबत मूर्तिकार संभ्रमावस्थेत आहेत. म्हणून असंख्य मूर्तिकारांनी अजून दुर्गादेवीच्या मूर्ती घडविण्यास सुरवात केलेली नाही.

संपादन : राजेश सोनवणे  

loading image