esakal | कोरोना सेंटरमधून आजीबाई गायब..आणि केळीच्या बागेत सापडल्या
sakal

बोलून बातमी शोधा

corona patients

कोरोना सेंटरमधून आजीबाई गायब..आणि केळीच्या बागेत सापडल्या

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन कोविड सेंटरमध्ये कोरोनाच्या उपचारार्थ दाखल झालेली तांदलवाडी (ता. रावेर ) येथील महिला कोणालाही न सांगता पहाटे निघून गेल्या. मात्र पोलीस प्रशासनाने काही तासातच तिला शोधून परत सेंटरला आणले . सदर महिला अचानक न सांगता निघून गेल्यामुळे प्रशासन व नातेवाईकांना तिला शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. ती सापडल्यामुळे नातेवाईकांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

हेही वाचा: निर्यातदार कंपन्यांना रेमडेसिव्हिर वितरणास मान्यता

येथील रेल्वे स्थानक रोडवरील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन कोविड सेंटरमध्ये तांदलवाडी (ता. रावेर) येथील महिला पद्माबाई कडू ठाकूर (वय 65) ही उपचारार्थ दाखल झाली होती.आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही महिला सेंटरवरून निघून गेली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी सेंटरच्या कर्मचाऱ्यांना याची विचारणा केली. मात्र याबाबत त्यांना काहीही माहिती नव्हती. यामुळे नातेवाईक व कर्मचाऱ्यांमध्ये सकाळी शाब्दिक चकमक झाली. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने ती कुठे असेल याबाबत सर्वांना काळजी होती.

हेही वाचा: बियाणे, खतांचा काळाबाजार कृषी विभागाचे कंट्रोल रूम रोखणार

आणि पोलिसांचा शोध सुरू

याबाबत काही जणांनी येथील पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांना ही घटना कळविली. तातडीने पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव, पोलीस नाईक सुनील वंजारी, गोपाळ पाटील यांनी रावेर शहराच्या चारही दिशेला शोध घेतला. दरम्यान ही महिला रेल्वे स्थानक रोडवरील जुना पुनखेडा रोडवरील बौद्ध नगरीच्या पुढील बाजूस जुन्या स्मशानभूमीजवळ केळीच्या बागेत एका झाडाखाली बसलेली आढळून आली.या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा ऑक्सीजन सेंटरवर आणले. यामुळे पोलीस , ग्रामीण रुग्णालय प्रशासन व नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

हेही वाचा: जिल्हा कोविड रुग्णालयांवर आता सोळा शिक्षकांची नियुक्ती

गेटला कुलूप लावावे

येथील ग्रामीण रुग्णालयाचे आवार प्रशस्त आणि बंदिस्त आहे पण येथील फाटक रात्रीही उघडेच असते. प्रशासनाने रात्री ते बंद करावे अशी येथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे