
गेल्या दहा दिवसांत ३५ शेतकऱ्यांचा एक हजार ९३० क्विंटल मका खरेदी झाला आहे. मात्र, याच कालावधीत एकाही ज्वारी उत्पादक शेतकऱ्याची ज्वारी शासनाच्या निकषात बसत नसल्याने खरेदी झालेली नाही.
रावेर : शासनाच्या भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात मक्याची खरेदी जोरात सुरू असली तरीही जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने ज्वारी काळी आणि रंगहीन झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही आतापर्यंत फक्त १८३ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झाली आहे. रंगहीन ज्वारीची खरेदी शासन करीत नसल्याने जिल्ह्यातील सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे मातीमोल ज्वारी विकावी लागत आहे. शासनाने या प्रकरणी लक्ष घालून ही ज्वारी खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
आवश्य वाचा- अहंपणाच्या नेतृत्वामुळेचं भाजपचा पराभव- एकनाथ खडसे
राज्य शासनाने अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या माध्यमातून भरड धान्य खरेदी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत ज्वारी आणि मका या धान्याच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. याअंतर्गत मक्याची खरेदी जिल्ह्यात जोरात सुरू आहे. एकट्या रावेर तालुक्यात गेल्या दहा दिवसांत ३५ शेतकऱ्यांचा एक हजार ९३० क्विंटल मका खरेदी झाला आहे. मात्र, याच कालावधीत एकाही ज्वारी उत्पादक शेतकऱ्याची ज्वारी शासनाच्या निकषात बसत नसल्याने खरेदी झालेली नाही. यामुळे असंख्य शेतकरी येथील ज्वारी खरेदी केंद्रावरून हात हलवत परत गेले आहेत.
शासनाचे ज्वारी खरेदीचे निकष कडक
शासन फक्त पांढरीशुभ्र अशी एफएक्यू दर्जाचीच ज्वारी खरेदी करत आहे. मात्र, जिल्ह्यातील ज्वारी परतीच्या पावसामुळे रंगहीन झाली आहे. यामुळे ही ज्वारी खरेदी करण्यास खरेदी केंद्रावरील ग्रेडर नकार देत आहेत. शेतकऱ्यांना नाइलाजाने ही ज्वारी स्थानिक बाजार समितीच्या लिलावात शासनाच्या दराच्या निम्म्या दराने विकावी लागत आहे. गुरुवारी (ता. ३) रावेर बाजार समितीच्या लिलावात ज्वारीला फक्त ११८१ ते १३४० रुपये भाव मिळाला. जिल्ह्यात तन हजार ७० शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी शासनाकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे. आतापर्यंत निकषात बसणाऱ्या फक्त १८३ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त ५०० शेतकऱ्यांची ज्वारी शासन दोन हजार ६२० रुपये क्विंटल भावाने खरेदी करेल आणि सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना आपली ज्वारी निम्म्या भावात व्यापाऱ्यांना विकावी लागेल अशी स्थिती आहे.
ज्वारीचा नमुना आणण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी त्यांच्या ज्वारीचा फक्त थोडासा नमुना खरेदी-विक्री संघात आणावा आणि नमुना पाहून ग्रेडरने अनुमती दिल्यास ज्वारी खरेदी केंद्रावर ट्रॅक्टरमध्ये ज्वारी भरून आणावी, असे आवाहन येथील खरेदी-विक्री संघाने केले आहे. असंख्य शेतकऱ्यांनी आपल्या ज्वारीचे नमुने खरेदी-विक्री संघात आणले, पण ग्रेडरने ही ज्वारी खरेदी करण्यास नकार दिला. पालकमंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी लक्ष घालून ज्वारीच्या तीन वेगवेगळ्या श्रेणी करून ज्वारी खरेदी करावी, ज्वारीला दोन हजार ६२० रुपयांपेक्षा कमी भाव दिला तरी चालेल पण शासनानेच ती खरेदी करावी, अशी मागणी ज्वारी उत्पादक शेतकरी करीत आहेत.
वाचा- प्रेम संबंधाच्या संशयावरून भर चौकात तरुणांवर ब्लेडने वार -
शासनाच्या आदेशानुसार उत्कृष्ट प्रतीच्या ज्वारीचीच (एफएक्यू प्रतीच्या) खरेदी करण्यात येत आहे.
-जी. एन. मगरे, जिल्हा पणन व मार्केटिंग अधिकारी,
जळगाव
संपादन- भूषण श्रीखंडे