पट्टेदार वाघाच्या आजही आढळल्या पाऊल खुणा !

दिलीप वैद्य
Saturday, 23 January 2021

वाघाच्या पावलांच्या खुणा आढळून आलेला हा परिसर पुरी गोलवाडा या नवीन पुनर्वसित झालेल्या गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील जुने पुरी गावाजवळ आहे.

रावेर : तालुक्यातील पुरी- गोलवाडे येथे केळीच्या बगिच्यात शनिवारी (ता. २३) पुन्हा पट्टेदार वाघाच्या पावलांच्या खुणा आढळून आल्या आहेत. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ दिसून आला नसला तरी कॅमेऱ्याच्या शेजारील केळीच्या बागेत आजही पुन्हा त्याच्या पावलांच्या खुणा आढळून आल्या आहेत. या खुणांवरून हा पूर्ण वाढ झालेला वाघ असल्याचे वन विभागाचे वनपाल अरविंद धोबी आणि अतुल तायडे यांनी सांगितले. 

आवश्य वाचा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वता:ला जमीनीत गाडून केले आत्मक्लेश आंदोलन

अंबादास पाटील यांच्या म्हशीचे पारडू आणि गाईच्या वासराला जखमी केल्यानंतर वाघाने बैलालाही जखमी केल्याचे शनिवारी (ता. २३) आढळून आले. याबाबतचा अहवाल वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आला असून, ते देखील रविवारी (ता २४) येथे भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हरिलाल कोळी तसेच पुरी गोलवाडा येथील पंकज पाटील, नितीन पाटील, रतिराम तायडे, अंबादास पाटील यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथील केळी बागेत पाहणी केली. 
 

आवश्य वाचा- बँकेतुन कुठल्याही प्रकारची रोकड चोरी गेलेली नसली तरी सुमारे 20 हजार रूपयांचे नुकसान झाले 

वाघाच्या पावलांच्या खुणा आढळून आलेला हा परिसर पुरी गोलवाडा या नवीन पुनर्वसित झालेल्या गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील जुने पुरी गावाजवळ आहे. या परिसरात तापी नदीचे आणि हतनूर प्रकल्पाचे बॅकवॉटर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरले असून, मोठ्या प्रमाणात दाट झाडी आहे. याठिकाणी रानडुकरांचाही वावर मोठ्या प्रमाणात असून, वाघासाठी भक्ष्य आणि लपण्यासाठी जागा सहज उपलब्ध होत असल्याने याठिकाणी वाघाचा वावर नेहमीच आढळून येतो. दोन वर्षांपूर्वी देखील येथे एका वाघिणीचा वावर आढळून आला होता. तिने दोन पिलांना जन्म दिला. नंतर काही दिवसांनी ही वाघीण येथून निघून गेली होती. तापी नदीचे अरुंद पात्र पाहून तेथून पलीकडे पोहून जात ही वाघीण मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रात निघून गेली असावी, असा वन विभागाचा अंदाज आहे. ही तीच वाघीण आहे काय याचा वनविभाग शोध घेत आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver footprints leased tigers still found today