कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश..का सांगितले त्‍यांना घरी जाण्यास म्‍हणताच तराळले अश्रू

दिलीप वैद्य
Sunday, 18 October 2020

तिघांचे त्याच्या घरी येणे- जाणे होते. आम्ही त्या रात्री उशिरा घरी परत येऊ शकत नाही. हे लक्षात आल्यावर गुड्डूला फोन करून घरी जा आणि घराकडे चक्कर मार म्‍हणून सांगितले. 

रावेर (जळगाव) : बोरखेडा येथे झालेल्या हत्त्याकांडात बळी पडलेल्या चारही लहानग्यांवर शनिवारी (ता. १७) येथील बऱ्हाणपूर रस्त्यानजीकच्या मोकळ्या जागेत दफनविधी करण्यात आला. या वेळी भिलाला कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. चिमुकल्यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा ही एकच मागणी परिसरातून करण्यात येत होती.

त्‍याने केली भावनांना वाट मोकळी
ज्या मित्रांना घराकडे आणि लहान भाऊ- बहिणीकडे लक्ष द्यायला सांगितले; त्यांनीच विश्वासघात करून बहिणीवर अत्याचार केले अशी प्रतिक्रिया चारही ही मृत बालकांचा मोठा भाऊ संजय भिलाला याने व्यक्त केली. हे सांगताना त्याचे अश्रू अनावर झाले व त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. संजय म्हणाला, की गुड्डू, सुनील आणि मुकेश हे तिघे जण मित्र होते. तिघांचे त्याच्या घरी येणे- जाणे होते. आम्ही त्या रात्री उशिरा घरी परत येऊ शकत नाही. हे लक्षात आल्यावर गुड्डूला फोन करून घरी जा आणि घराकडे चक्कर मार म्‍हणून सांगितले. 

चेहराही नाही बघितला
मात्र त्यांची नियत फिरली आणि त्यांनी बहिणीवर अत्याचार केल्याचे त्याने रडत रडतच सांगितले. मृत भाऊ- बहिणीचा चेहराही बघु शकलो नाही. या तिघा आरोपींचा एन्काऊंटर करावा नाही; तर तिन्ही आरोपींना आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांना योग्य ती शिक्षा करू असे म्हणताना संजय अनेकदा भावनाविवश झाला.
 
दफनविधी करताना साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी
दरम्यान, त्यापूर्वी जळगाव येथे चारही मृतदेहांचे विच्छेदन करून ते रावेर येथे आणण्यात आले. यावेळी भिलाला कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. संजय भिलाला याला शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले होते. मात्र दुसऱ्या शनिवारी सकाळपर्यंतही त्याला परत आणले नव्हते. मृतांच्या मोठ्या भावाला पोलिसांनी का ताब्यात ठेवले आहे ? त्याला आणल्याशिवाय अंत्यसंस्कार करू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली. अखेर पोलिसांनी त्याला आणल्यावर चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाचे पालकत्व आता महाराष्ट्र सरकारने स्विकारावे, या कुटुंबाची स्थिती अत्यंत हलाखीची आहे, अशी मागणी परिसरातून करण्यात आली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत
काल रात्री उशिरा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने भिलाला कुटुंबाला मदत करण्यात आली. त्यांच्या घराभोवती अंधार असताना मोठे विद्यूत दिवे संघाच्या कार्यकर्त्यांनी लावले. तसेच या चारही बालकांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य पिण्याचे पाणी देखील कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिले. अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, रवींद्र महाजन, नथू महाजन, सागर चौधरी, सचिन महाजन यांच्यासह अंबिका व्यायाम शाळेच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver four child killed case heartbreaking cries of the family