बालकांच्या हत्याकांडाचा खटला जलद गती न्यायालयात : गृहमंत्री देशमुख

दिलीप वैद्य
Saturday, 17 October 2020

बोरखेडा (ता.रावेर) येथे शुक्रवारी (ता.१६) चार बालकांची निर्घृण हत्या झाली. या घटनास्‍थळी गृहमंत्री देशमुख यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. तसेच पिडीत कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.

रावेर (जळगाव) : बोरखेडा (ता. रावेर) येथील हत्याकांड माणूसकीला काळीमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व पिडीतांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यासाठी अ‍ॅड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येणार असल्‍याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

बोरखेडा (ता.रावेर) येथे शुक्रवारी (ता.१६) चार बालकांची निर्घृण हत्या झाली. या घटनास्‍थळी गृहमंत्री देशमुख यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. तसेच पिडीत कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, प्रातांधिकारी कैलास कडलग, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसिलदार उषाराणी देउगुणे आदी उपस्थित होते.

तपास लवकर पुर्ण करण्याचे निर्देश
यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले, की या हत्याकांडाचा पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून त्यांना सकारात्मक पुरावे मिळाले आहेत. काही संशियतांना ताब्यात ही घेण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले. त्याचबरोबर शासन नियमानुसार पिडीतांना योग्य ती मदत देण्यात येईल. तसेच त्यांना रेशनकार्ड, जातीचा दाखला, घरकुल व शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver home minister anil deshmukh meet child murder case family