esakal | विवाह तारीख निश्‍चितीसाठी केला फोन; तर वरपित्‍याचे धक्‍कादायक वक्‍तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

Dowry

मुलीचा साखरपुडा ३ नोव्हेंबर २०१९ रोजी झाला. त्या दिवशी विवाहाची तारीख निश्चित झाली. मात्र, कोरोनाच्या लॉकडाउनमुळे विवाह झाला नाही. मुलीच्या पित्याने विवाह तारीख निश्चित करण्याबाबत फोनवर विनवणी केली

विवाह तारीख निश्‍चितीसाठी केला फोन; तर वरपित्‍याचे धक्‍कादायक वक्‍तव्य

sakal_logo
By
प्रदीप वैद्य

रावेर (जळगाव) : लग्नात मुलाला दहा लाख रुपये हुंडा द्यावा; अन्यथा लग्न मोडू, अशी धमकी वरपित्याने दिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी साखरपुड्यात मुलास दिलेले दागिने व झालेला खर्चाची मागणी केली. मात्र, शिवीगाळ करून दागीने व खर्च देण्यास नकार देऊन फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
विश्राम जिन्सी (ता. रावेर) येथील चरणसिंग पवार यांच्या मुलीचा साखरपुडा ३ नोव्हेंबर २०१९ रोजी झाला. त्या दिवशी विवाहाची तारीख निश्चित झाली. मात्र, कोरोनाच्या लॉकडाउनमुळे विवाह झाला नाही. मुलीच्या पित्याने विवाह तारीख निश्चित करण्याबाबत फोनवर विनवणी केली असता १० लाख रुपये हुंडा पाहिजे तेव्हा आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करू, पैसे न दिल्यास आम्ही लग्न मोडून टाकू, अशी धमकी मुलाकडील मंडळी देत होती. 

दागिने मागताच मिळाली धमकी
अखेर मुलीच्या पित्याने साखरपुड्यात झालेला खर्च व मुलास दिलेले दागिने परत द्या, अशी मागणी केली असता शिवीगाळ करून आम्ही दागिने देणार नाही व साखरपुड्याचा खर्चही देणार नाही. तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, अशी धमकी दिली व फसवणूक करून हुंड्याची मागणी केली, अशी तक्रार चरणसिंग यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून सुदर्शन चव्हाण, भालचंद्र चव्हाण, रितेश चव्हाण, अनिता चव्हाण (सर्व रा. सुंदर कॉम्प्लेक्स, गौरी पाडा, कल्याण पश्चिम, जि. ठाणे) व अनिता राठोड (रा. मालेगाव रोड, चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी राजेंद्र राठोड तपास करीत आहेत.  

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image