अनिल देशमुख आणि खडसेंमध्ये गुप्तगू; सस्‍पेन्स कायम

दिलीप वैद्य
Saturday, 17 October 2020

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची गाडी तालुक्यातील बोरखेडा येथील पीडितांच्या परिवाराला भेट देऊन जळगावकडे निघाली होती. रावेर शहरा बाहेर असलेल्या बिजासनी माता मंदिराजवळील ढाब्याजवळ माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आपल्या गाडीत त्यांची वाट पाहत होते.

रावेर (जळगाव) : रावेर येथे बालकांच्या हत्‍याकांड प्रकरणात कुटूंबाची भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आले होते. या दरम्‍यान खडसे रावेर शहराबाहेर देशमुखांची वाट पाहत गाडीत बसले होते. अनिल देशमुख येताच दोघांमध्ये पाच मिनिट गुप्तगू चालली. यावेळी दोघांव्यतिरिक्‍त अन्य कोणीच नव्हेत. यामुळे दोघांमधील चर्चेचे सस्‍पेन्स राहिले; पण आता पडदा उघडणार हे मात्र निश्‍चित झाले.

रावेर तालुक्‍यातील बोरखेडा येथे चार बालकांची हत्‍या झाल्‍याची घटना घडली. या घटनेमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची गाडी तालुक्यातील बोरखेडा येथील पीडितांच्या परिवाराला भेट देऊन जळगावकडे निघाली होती. रावेर शहरा बाहेर असलेल्या बिजासनी माता मंदिराजवळील ढाब्याजवळ माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आपल्या गाडीत त्यांची वाट पाहत होते. देशमुख यांची गाडी तिथे थांबली आणि तिथेच दोघा ज्येष्ठ नेत्यांची गुप्तगू सुमारे पाच मिनिटे सुरू होती. खडसे यांच्या गाडीचा चालकही तिथे उपस्थित नव्हता. यामुळे दोघांमध्ये काय बोलणे झाले हे कोणालाही कळले नाही. मात्र श्री देशमुख यांच्या बरोबर असलेले सर्व कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा ताफा आणि श्री खडसे यांचेही सोबत असलेले कार्यकर्ते लांब उभे राहून त्यांच्या दोघांमध्ये सुरू असलेल्या चर्चेबद्दल तर्क-वितर्क करीत होते.

पहिल्‍या माळेला चर्चा दसऱ्याचा येणार सर्वांसमोर
नवरात्राच्या पहिल्याच दिवशी बिजासनी देवीच्या साक्षीने या दोघांमध्ये हे काय गुफ्तगू झाले. हे नवरात्राच्या अखेरच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सर्वांसमोर येईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. दरम्यान नाथाभाऊंचा राष्ट्रवादीत प्रवेश नक्की असून त्यांनी भाजपमधील कार्यकर्त्यांना "राम राम" करणे सुरू केले आहे; अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. दोघांमधील चर्चा देशमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत पोहचविणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

जातांना तिघे एकाच गाडीत
त्या आधी खडसे नव्या विश्रामगृहात अनिल देशमुख यांची वाट पाहत होते. अनिल देशमुख यांनी एकनाथ खडसे आणि आमदार शिरीष चौधरी यांना आपल्या गाडीत घेतले. बोरखेडा येथील घटनास्थळ आणि वसतिगृहात पीडितेच्या पालकांशी भेटतांना तिघेही एकाच गाडीत होते. पण परत जातांना खडसे आपल्या गाडीत बसले. आणि ही गुफ्तगू झाली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver minister anil deshmukh and eknath khadse meet