गावकऱ्यांनी खाण्यास दिल्‍याने माकडांनी घातला हैदोस; दोघांना केले जखमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

जंगलातून गावात शिरलेल्‍या माकडांना गावकऱ्यांनी खाण्यास दिले; त्‍या माकडांचा गावातच मुक्‍काम सुरू झाला. पण या माकडांनी गावात हैदोस घातला आणि नको ते घडले. यामुळे गावात एकच धावपळ उडाली.

रावेर (जळगाव) : रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे पंचवीस- तीस माकडांनी सध्या हैदोस घातला असून, दोन जणांचा चावा घेतल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वनविभागाने या उपद्रवी माकडाचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 
गावात माकड आल्‍यानंतर मुलांना त्‍याचे कुतूहल असते. माकड पाहण्यासाठी मुले गर्दी करत असतात. पण गावात एक नव्हे तर वीस- पंचवीस माकडे आल्‍याने गावात चांगलीच तारांबळ उडाली. जंगलातून गावात शिरलेल्‍या माकडांना गावकऱ्यांनी खाण्यास दिले; त्‍या माकडांचा गावातच मुक्‍काम सुरू झाला. पण या माकडांनी गावात हैदोस घातला आणि नको ते घडले. यामुळे गावात एकच धावपळ उडाली.

खाण्यास मिळाले म्‍हणून जमली गर्दी
पुनखेडा गावात मागील वर्षापासून पाच ते सात माकडे आली होती. या माकडांना गावकऱ्यांनी खाद्यपदार्थ दिल्याने हळूहळू येथे माकडांची संख्या वाढली आहे. गाव आणि परिसरातील जंगलात २५ पेक्षा जास्त माकडे आहेत. यातील एक माकड उपद्रवी असून, त्याने घरात घुसून दोन दिवसांपूर्वी रघुनाथ घमा पाटील (वय ६५) यांच्या पायाला चावा घेऊन गंभीर जखमी केले. तर आज गणेश समाधान धनगर (वय १६) याच्या पायाचा चावा घेतला आहे. दोघांना खासगी रुग्णालयात उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या एकाच उपद्रवी माकडाने दोघांना चावे घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वनविभागाने या उपद्रवी माकडाचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver punkheda village come to monkey and attack people