दंगलीतील संशयीताचा सत्‍कार करणे पडले महागात...

दिलीप वैद्य
Friday, 24 July 2020

शहरात किरकोळ कारणावरून २२ मार्चला दोन गटात जोरदार दंगल उसळली होती. या दंगलीतील संशयित आरोपी मधुकर शिंदे यांची नंदुरबार कारागृहातून १४ जुलैला जामिनावर सुटका झाली.

रावेर : मार्च महिन्यात झालेल्या जातीय दंगलीतील जामिनावर सुटलेल्या दोन संशयित आरोपींचा सत्कार करणाऱ्या दोन्ही गटांच्या ३५ जणांविरुद्ध रावेर आणि सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

शहरात किरकोळ कारणावरून २२ मार्चला दोन गटात जोरदार दंगल उसळली होती. या दंगलीतील संशयित आरोपी मधुकर शिंदे यांची नंदुरबार कारागृहातून १४ जुलैला जामिनावर सुटका झाली. त्यानंतर शिवाजी चौकात त्यांचा सत्कार करणाऱ्या दीपक शिंदे, जयेश शिंदे, दीपक महाजन, गोकूळ शिंदे यांच्यासह मधुकर शिंदे आणि सुमारे २५जणांवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, घोषणा देऊन शांततेचा भंग करणे यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच दंगलीतील शेख कालू शेख नुरा यांची एक जुलैला नंदुरबारच्या कारागृहातून जामिनावर सुटका झाली होती. त्याचाही सत्कार सावदा येथे करण्यात आला होता. त्यात गयासुद्दीन काझी, येथील पालिकेचे नगरसेवक व सत्ताधारी गटाचे नेते आसिफ मोहम्मद, शेख युसुफ, आरिफ शेख युसूफ (सर्व रा. रावेर) यांच्यासह शेख कालू शेख नुरा यांच्यासह सावदा, वाघोदा येथील मिळून दहा जणांविरुद्ध शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला म्हणून सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा येथील सत्काराचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. यापुढे रावेर आणि रसलपुर येथील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. येथील दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई संशयित आरोपींकडून वसूल करण्याच्या प्रस्तावापाठोपाठ पोलिसांनी सत्कार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

संपादन : राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver The riot parson jamin and Truth again police registers fir