esakal | केळी नुकसानबाबत विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची चाचपणी !

बोलून बातमी शोधा

banana
केळी नुकसानबाबत विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची चाचपणी !
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : जून २०२० मध्ये वेगवान वाऱ्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त केळीसाठी सुमारे २० कोटी रुपये भरपाई देण्यासंबंधी विमा कंपनी टाळाटाळ करीत असल्याने या विमा कंपनीविरुद्ध शेतकरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या इराद्यात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत आवश्यक ती कागदपत्रे गोळा होताच तक्रार दाखल करण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांचा संताप अनावर होऊ नये म्हणून काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा झाल्याचे सांगितले. याबाबतची अधिक माहिती अशी, की ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या विमा कंपनीने तालुक्यासह जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यां‍च्या केळीचा विमा २०२० मध्ये काढला होता. किमान आणि कमाल तापमानामुळे केळीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळाली. मात्र, त्याआधी जून २०२० मध्ये झालेल्या वादळामुळे केळीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नव्हती. १५ सप्टेंबर २०२० पूर्वीच ही सर्व नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. विमा कंपनीने शेतकऱ्यांना लवकरच भरपाई देऊ, असे आश्वासन वारंवार दिले. मात्र, प्रत्यक्षात सात महिन्यानंतरही भरपाई मिळालीच नाही. अखेर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला. त्यावर विमा कंपनीने १५ एप्रिलच्या आत भरपाईची रक्कम देण्याचे मान्य केले व तसे लेखी पत्र येथील तहसीलदारांकडे पाठवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केले. मात्र १५ एप्रिल उलटून गेली तरीही भरपाई न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शासन आणि शेतकरी या दोघांचीही फसवणूक विमा कंपनी करीत आहे म्हणून येथील पोलिस ठाण्यात कंपनीविरुद्ध तक्रार देता येईल का, याची चाचपणी सुरू आहे.

शेतकऱ्यांचा राग शमवण्याचा प्रयत्न :

कंपनीकडून मोजक्याच शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे देण्यात आले असून जिल्ह्यासाठी किमान २० कोटी रुपये नुकसान भरपाई देणे बाकी आहे. त्यात, रावेर तालुक्यातील २०५३ शेतकऱ्यांचे ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई प्रलंबित आहे. येत्या दोन- तीन दिवसातच येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात येईल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, १५ एप्रिलची मुदत उलटून गेल्यानंतर विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना तहसीलदार, कृषी अधिकारी, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही दूरध्वनी केला असता त्यांचेही फोन स्वीकारण्यात आलेले नाहीत. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे.

सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा केल्यानेच विमा कंपनीने काही मोजक्या केळी उत्पादकांची भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकर भरपाई मिळावी.

- विलास ताठे,

शेतकरी, कुंभारखेडा (ता. रावेर)

संपादन- भूषण श्रीखंडे