इंडीयन आयडल स्टेजवर झाडू मारणारा ते त्याच मंचावरील गायक; युवराजचा थक्क करणारा प्रवास

प्रवीण पाटील
Friday, 4 December 2020

इंडीयन आयडलच्या स्टेजवर झाडू मारून साफसफाई करण्याचे काम मिळाले आणि सादर होणारे कार्यक्रम पाहून आपणही गायनाची कला सादर करावी; असा विचार मनात आला आणि संधी मिळाली. ‘खेळ मांडीयेला’ या गाण्याने साऱ्या देशात ओळख निर्माण झाल्‍याचा आनंद आहे

सावदा (जळगाव) : गायन व संगीताची लहानपणापासूनच खूप आवड व छंद. ही कला विकसित करून पुढे मोठा गायक बनायचे स्वप्न. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची. काहीतरी कामधंदा केल्याशिवाय पर्याय नाही. रोजगाराच्या शोधात चार- पाच वर्षापूर्वी मुंबई गाठली. मित्र दीपक तायडे यांनी मायानगरी मुंबईत सहारा दिला. सोनी टीव्हीवर सादर होणाऱ्या इंडीयन आयडलच्या स्टेजवर झाडू मारून साफसफाई करण्याचे काम मिळाले आणि सादर होणारे कार्यक्रम पाहून आपणही गायनाची कला सादर करावी; असा विचार मनात आला आणि संधी मिळाली. ‘खेळ मांडीयेला’ या गाण्याने साऱ्या देशात ओळख निर्माण झाल्‍याचा आनंद आहे असे नवोदित गायक युवराज मेढे याने सांगितले. 

सावदा येथील ख्वॉजानगरमधील रहिवाशी केळी कामगार कैलास मेढे यांचे युवराज हे मोठे चिरंजीव आहे. ते कामासाठी मुंबईत गेले आणि इंडियन आयडॉल खेळ मांडीयला या गाण्याचे सादरीकरण केल्याने सर्व परीक्षक भावुक झाले. त्याचा पहिला राऊंड यशस्वी झाला. त्याचे गाण्याचे चार अल्बम प्रसिद्ध झालेले आहे. गाण्याची आवड असल्याने नोकरी करीत असताना ऑडिशनमध्ये सहभाग होण्याचे ठरवले. त्यात 'खेळ मांडला' हे गाणे सादर केले. त्यात ऑडिशनमध्ये असलेले ऑडिअन्स भारावून गेले. व त्याचा जीवन प्रवास पहिल्या राऊंड मध्ये विजयी झाल्याने सुरू झालाा आहे .

नेहा कक्‍कर, हिमेश रेशमीया झाले अवाक
ऑडिशन्स दरम्यान जेव्हा युवराज स्टेजवर चालला आणि आपली ओळख करून दिली. तेव्हा समीक्षक नेहा कक्‍करने त्याला ओळखले आणि म्हणाली की तिने त्याला आधी पाहिले आहे. त्यांना त्याने सांगितले की आधीच्या हंगामात त्याने सलमान अली आणि सनीसाठी कॉम्फेटी साफ केली आहे. शो वर त्याला पाहून न्यायाधीश भारावून गेले आणि तो रंगमंचावर सादर करणार असा अत्यंत गर्वजनक क्षण असल्याचे त्यांना आढळले. त्याच्या तेजस्वी आवाजाने नेहाला खूप भावनिक केले आणि ती त्याचे कौतुक थांबवू शकली नाही. युवराजच्या चमकदार कामगिरीने न्यायाधीश नेहा आणि हिमेश भावना प्रधान झाले. 

युवराज होणार आयकॉन
इंडीयन आयडल 12 चा प्रीमियर सोनी टीव्हीवर 28 नोव्हेंबरला होणार आहे. गायन रिअॅलिटी शोमध्ये अनेक गायक स्पर्धक म्हणून असतील आणि त्यातील एक युवराज मेढे एक. महाराष्ट्रातील जळगाव जिल्हातील सावदा येथील रहिवासी असलेले युवराज न्यायाधीशांना ते सांगतील की ते इंडियन आयडॉलच्या सेटवर साफ सफाई करायचे. नेहा त्याला सेटवर पाहून आठवले. कन्फेटी साफ करण्यापासून ते त्याच मंचावर कामगिरी करण्यापर्यंतचे युवराज मेढे यांचे खरे स्वप्न होते. 

मजुरी करून भागत नाही मग.. 
युवराज मेढे लहानपणापासूनच संगीताची आवड होती. पण परिस्थिती अभावी संगीताचा प्रशिक्षण घेता आले नाही. कधीतरी वाटत होते, की आपणही आपला परफॉर्मन्स लोकांपर्यंत पोहोचवावा पण हिंमत होत नव्हती. शिक्षण बारावीपर्यंत त्यानंतर गावी असताना असंच इकडे तिकडे मजुरी करायचा. तेवढ्यात काही जमत नव्हते; मग मित्र फिल्म सिटीमध्ये मुंबईला काम करत असल्‍याने त्‍याला सहजच बोललो की मला कामाची अत्यंत गरज आहे. परिस्थिती खूप खराब आहे म्हणून मला आपल्या सोबत काम मिळेल का? तिथे फिल्म सिटीमध्ये तर मित्राने मला पटकन होकार दिला तुला मिळू शकते. तो मित्र म्हणजे दीपक तायडे. 

मित्रांनी आत्मविश्वास वाढवला
तीन ते चार वर्षापासून इंडियन आयडलमध्ये काम करत आहे. पण कधी असे वाटलं नव्हते की या मंचावर कला सादर करण्याची संधी मिळेल. हिंमत होत नव्हती; एवढ्या मोठ्या मंचावर कसं परफॉर्म करायचं. पण ही संधी मिळाली; ती फक्त मित्रांमुळे जे माझ्यासोबत काम करत होते. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवला. ते मला नेहमी बोलायचे की तो बूट पॉलिश करणारा मुलगा सानी हिंदुस्तानी या शोचा विनर होऊ शकतो; तु का नाही होऊ शकत. असाच मित्रांनी सुद्धा आत्मविश्वास वाढवला म्हणूनच हे शक्‍य झाले. 

आई- वडील भारावले
युवराजला लहानपणापासूनच गाण्याची आवड पण तो कधी टिव्ही दिसेल याची कल्‍पना नव्हती. आपला मुलगा कधी टीव्ही शोमध्ये गाणं म्हणेल असं वाटलं नव्हतं. पण त्याने जिद्दीने प्रयत्न केल्याने त्याला संधी मिळाली असून सोनी टीव्हीवर इंडियन आयडल या कार्यक्रमात गातांना पाहून आनंदाने डोळे भरून आले. युवराज मुळे लोक आता आम्हाला ओळखायला लागले आहेत. त्याने या क्षेत्रात पुढे जाऊन खूप प्रगती करावी; असे सर्वांनाच वाटत असल्‍याचे उद्गार युवराजचे आई- वडील कैलास मेढे व ममता मेढे याांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver yuvraj medhe indian idol stage perform