
राज्य शासनाकडून वारंवार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रशासनाला सांगण्यात येत आहे. असे असतानाही अशा पध्दतीने सार्वजनिक ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी जमवून संसर्गाला खतपाणी घालण्याचे प्रकार समोर येत आहेत.
वरणगाव : कोरोनाच्या परिस्थितीत विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचे येथील निजाम कलिम शेख याला चांगलेच महागात पडले आहे. वरणगाव पोलिसांनी डिजेसह लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा- रागाच्या भरात घरातून निघाली आणि भुसावळ स्टेशनमध्ये टी.सी स्टॉफच्या सतर्कतेमूळे सापडली -
वरणगाव येथील प्रभाग क्रमांक दोनमधील निजाम कलिम शेख (रा. वरणगाव) याचा वाढदिवस असल्याने भोगावती नदीपात्रातील पुलाजवळील ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी जमवून डिजेच्या तालावर केक कापण्याचे नियोजन होते. त्याकरिता शुभेच्छुकांसाठी शेकडो खुर्च्यांसह भव्य स्टेज उभारण्यात आले होते. भरीसभर म्हणून शेकडो समर्थकांनी मोटर सायकल रॅली काढून घोषणा देत शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदर प्रकार वरणगाव पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांना माहित झाल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली.
सदरील ठिकाणी आयोजकांनी डिजे व लाईटसाठी इलेक्ट्रीक तारांवर आकडे टाकून विजप्रवाह घेतला होता. राज्य शासनाकडून वारंवार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रशासनाला सांगण्यात येत आहे. असे असतानाही अशा पध्दतीने सार्वजनिक ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी जमवून संसर्गाला खतपाणी घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. साहित्य जप्त करताना एपीआय संदिपकुमार बोरसे, पीएसआय सुनील वाणी, पोलिस कर्मचारी फिर्यादी राहुल येवले, नवाब शहा, बापू पाटील, शांतीलाल सोनार आदी हजर होते.
संपादन- भूषण श्रीखंडे