वरणगावात दोनशेची बनावट नोट 

विनोद सुरवाडे
Monday, 7 December 2020

कृषी केंद्रात शेती उपयोगी माल विक्री करीत असताना व्यापाऱ्याच्या दुकानातील गल्ल्यात नकली हुबेहुब दोनशे रुपयांची बनावट नोट आढळून आली. या व्यापाऱ्यांकडून आठवड्याला विक्री झालेल्या मालाचा भरणा बँकेत जमा केला जातो.

वरणगाव (ता. भुसावळ) : येथील कृषी केंद्राच्या व्यापाऱ्याकडे कृषी माल विक्री करीत असताना गल्ल्यांत दोनशे रुपयांची बनावटी चलनी नोट आढळून आली आहे. दरम्यान, व्यापाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. 
वरणगाव येथील मुख्य रस्त्यालगत एका कृषी केंद्रात शेती उपयोगी माल विक्री करीत असताना व्यापाऱ्याच्या दुकानातील गल्ल्यात नकली हुबेहुब दोनशे रुपयांची बनावट नोट आढळून आली. या व्यापाऱ्यांकडून आठवड्याला विक्री झालेल्या मालाचा भरणा बँकेत जमा केला जातो. त्याच अनुषंगाने सोमवारी (ता. ७) भरणा घेऊन येथीलच महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जमा केला असता खजिनदार यांनी मोजणी यंत्रात नोटा टाकल्या असता एक नोट बाहेर फेकून दिली. 

नाव प्रसिद्ध न करण्याची अट
बँकेतील खजिनदार यांनी एक नोट बनावट असल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आणून दिले. या नोटेविषयी बँक अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याकडून माहिती जाणून घेतली असता आमचा कृषी केंद्रातील साहित्य विक्रीचा व्यवसाय असल्याने दुकानात गर्दीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही बनावट चलनी नोट कोणीतरी आमच्याकडे दिली आहे, असे व्यापाऱ्याचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र शहरांत खळबळ उडाली असून, इतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news varangaon two hundred duplicate note in bank