युवतीची हिम्‍मत पहा...एक लाख घेतले आता म्‍हणतेय लग्‍न नाही करायचे​

राजु कवडीवाले
Tuesday, 4 August 2020

लग्‍नाचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्‍याचे प्रकार ऐकण्यास मिळतात. अशा प्रकारात सहसा युवकाकडून फसवणूक होत असते. मात्र या प्रकरणात चित्र उलटे असून, एका युवकाला युवतीने लग्‍नाचे आमिष दाखविले आणि त्‍याच्याकडून एक लाख रूपये घेतले. पैसे घेतल्‍यानंतर तिने चक्‍क लग्‍न करण्यास नकार देत पडून जाण्याची तयारी केली होती.

यावल : तालुक्यातील चिंचोली येथे लग्नाचे आमिष दाखवून तरुणाकडून एक लाख रुपये घेऊन, ऐनवेळी लग्नास नकार देत, पोबारा करण्याच्या बेतात असलेल्या नवऱ्या मुलीसह मध्यस्थी दलाल व त्याची पत्नी अशा तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिघा संशयितांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 
चिंचोली येथील उमेश प्रल्हाद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की २९ जुलैला त्यांची भेट रवींद्र बाळू कुऱ्हाडे (रा. लोण, जि. औरंगाबाद) यांच्याशी झाली. त्यांनी उमेश पाटील यांना लग्नासाठी मुली हवी असतील, तर मुलींच्या पालकांना पैसे द्यावे लागतील. त्यानुसार उमेश पाटील यांनी पैसे देण्यास होकार दिला. संशयित कुऱ्हाडे याने एक लाख रुपये घेऊन उमेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना भोकरदन (जि. जालना) येथील शेतात मंदिरावर मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम केला. 

म्‍हणे मुलीच्या घराजवळ कोरोनाग्रस्‍त
उमेश पाटील यांना मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाला. मात्र पाटील यांना मुलगी शेतातच दाखविण्यात आली. यावर उमेश पाटील यांनी मुलगी शेतात का दाखविली, त्यांचे घर बघायचे आहे, असे सांगताच, संशयित कुऱ्हाडे यांनी नवऱ्या मुलीच्या घराजवळ कोरोना रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर असल्याने तेथे जाता येणार नाही. आपण चिंचोली येथेच लग्न लावू, असे सांगून सोमवारी (ता. ३) चिंचोली येथे लग्नासाठी रवींद्र कुऱ्हाडे, त्याची पत्नी सोनाली कुऱ्हाडे व नवरी मुलगी शुभांगी तुकाराम नागरे, सीमा प्रकाश जाधव (नवऱ्या मुलीची मावशी) व इतर चार ते पाच लोक (सर्व रा. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) आले. 

ऐनवेळी नकार
सर्व काही ठरले असताना ऐनवेळी नवऱ्या मुलीने लग्नास नकार दिला. त्यानंतर रवींद्र कुऱ्हाडे व त्याची पत्नी, नवरी मुलगी, तिची मावशी पळून जाण्याच्या बेतात असताना, उमेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी नवऱ्या मुलीसह मध्यस्थ दलाल कुऱ्हाडे, त्याची पत्नी सोनाली कुऱ्हाडे यांना सोमवारी रात्री पोलिस ठाण्यात जमा केले. 

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal taluka girl fraud one lakh cash boy and marriage not intrested