प्रशासकाचे घरी बसून काम; ग्रामस्‍थांनी घातला खुर्चीला हार

ललीत तडवी
Tuesday, 20 October 2020

दीड महिन्यापासून प्रशासक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान हजर झाल्यापासून प्रशासक अधिकारी यांनी फक्त एकच दिवस शिरसाड ग्रामपंचायतीला येथे भेट दिली आहे. तर गेल्या एक ते दीड महिन्यापासून ते गायब झाले आहेत. 

यावल (जळगाव) : साकळी (ता.यावल) येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्यात आले आहे. परंतु, दीड महिन्यात एकच वेळेस प्रशासक आले असून घरी बसून काम करत असल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे. यामुळे ग्रामस्‍थांनी आज खुर्चीला हार घालून निषेध व्यक्‍त केला.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. यामुळे ग्रामपंचायतीवर शासनाच्या आदेशान्वये गेल्या दीड महिन्यापासून प्रशासक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान हजर झाल्यापासून प्रशासक अधिकारी यांनी फक्त एकच दिवस शिरसाड ग्रामपंचायतीला येथे भेट दिली आहे. तर गेल्या एक ते दीड महिन्यापासून ते गायब झाले आहेत. यामुळे गावाच्या विकासकामांना खिळ बसलेली आहे.

कागदोपत्री जबाबदारी पाडताय पार
कोणतेही काम वेळेत होत नसल्याने कागदपत्र व इतर कामांच्या अभावी ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहे. सदरील प्रशासन अधिकारी घरी राहूनच ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांवर सह्या करत नुसती कागदोपत्री आपली जबाबदारी पार पाडीत आहे. प्रत्यक्षात कामकाज मात्र शून्य होत आहे. त्यामुळे गावाच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराचा पुरता बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे संतप्त होऊन काही पदाधिकारी व नागरिकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीतील प्रशासक अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा 'गांधीगिरी'च्या मार्गाने निषेध व्यक्त केलेला आहे.

नागरीकांची संतप्त भावना
खुर्चीला हार घालतेप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रितेश पाटील, प्रमोद सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान सोनवणे, रोहिदास तायडे, एकनाथ धनगर, राजू सोनवणे आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे गाव विकासापासून मागे पडेल; अशी संतप्त भावना व्यक्त करण्यात आली. प्रशासक अधिकारी लवकरात लवकर ग्रामपंचायतीस हजर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. संबंधित प्रकरणी निषेध व्यक्त करणाऱ्या पदाधिकारी व नागरिकांकडून प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal taluka shirsad gram panchayat administeter work for home