
शेतात बेकायदेशीररीत्या सुमारे ३५ ते ४० ब्रास वाळू साठवून ठेवल्याचे आढळून आले असून ठेवलेल्या वाळूचा पंचनामा केला. तसा अहवाल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
यावल : शेतकरी शेतात पिकांची लागवड पासून ते धान्य साठवण करण्याचे एरवी पाहत असतो. पण यावल तालुक्यातील कोरपावलीजवळ शेतकऱ्याने आपल्या शेतात सुमारे ३५ ते ४० ब्रास विनापरवाना वाळूची साठवण करून ठेवली होती. याबाबत महसूल प्रशासनाने शेतकाऱयावर कारवाई केली आहे.
यावल तालुक्यातील कोरपावली गावाजवळ यावल शहराकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर कमलाकर तुकाराम नेहते यांच्या शेतात बेकायदेशीररीत्या सुमारे ३५ ते ४० ब्रास वाळू साठवून ठेवल्याचे आढळून आले असून, याबाबत कोरपावली विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी तथा कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे यांनी शेतात जाऊन बेकायदेशीरपणे साठवण करून ठेवलेल्या वाळूचा पंचनामा केला. तसा अहवाल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
अनेक शेतात वाळू साठा
वाळू साठवण करणाऱ्या शेतमालकावर शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. परिसरात विविध ठिकाणी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या उपसा करून आणलेली वाळूची साठवण काही वाळूमाफियांकडून करण्यात आली आहे.
महसुलने रात्री गस्त वाढविणे गरजेचे
शहरात चालणाऱ्या शासकीय किंवा खासगी बांधकामावर ही वाळू छुप्या मार्गाने वाढत्या किमतीत दिली जात असल्याचे कळते. यासाठी महसूल प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त वाढविल्यास या प्रकारास प्रतिबंध करता येईल.
संपादन- भूषण श्रीखंडे