
शहरातील रुणांना दवाखान्यातून घरी अथवा घरून दवाखान्यात ने-आण करण्यासाठी सेवा उपलब्ध होणार आहे.
जळगाव : मराठी प्रतिष्ठान व रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट व यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात प्रथमच ‘बाइक ॲम्ब्युलन्स’ सेवा लवकरच सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच सेवाभावी उपक्रम आहे.
‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर शहरातील रुणांना दवाखान्यातून घरी अथवा घरून दवाखान्यात ने-आण करण्यासाठी सेवा उपलब्ध होणार आहे. टू व्हिलर बाइक ॲम्ब्युलन्स सेवा महाराष्ट्रात प्रथमच जळगाव येथे सुरू होत आहे. ‘लाइफलाइन’ या नावाने सुरू होणाऱ्या या सेवेला रामलाल चौबे मेमोरियल ट्रस्टने शंभर टक्के अर्थसहाय्य केले आहे.
रविवारी लोकार्पण
मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाइक ॲम्ब्युलन्स सेवा संचलित केली जाणार आहे. बाइक ॲम्ब्युलन्सची अंतर्गत/बाह्य सजावट केली आहे. रुग्णवाहिकेत स्ट्रेचर व फॅनची व्यवस्था असून, या बाइकला साइड कार असेल. या उपक्रमास रविवारी (ता. १०) सुरवात होत असून, रुग्णवाहिकेचे लोकार्पण होणार आहे.
जळगाव शहरातील रुग्णांसाठी संजीवनी ठरू शकेल. बाइकवरील रायडर प्रशिक्षित असून, त्याला प्रथमोपचारांसंबंधी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
-ॲड. जमील देशपांडे
संपादन- भूषण श्रीखंडे