जाडगाव बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी जातेय वाहून | Jadgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाडगाव बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी जातेय वाहून

जाडगाव बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी जातेय वाहून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वरणगाव : येथून जवळच असलेल्या जाडगाव गावालगत शेतशिवारातून वाहून येणाऱ्या एका नाल्यावर केटीवेअर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र पाणी अडवण्याच्या ‘फायबर प्लेट’ सडल्याने व नवीन प्लेट बसवता येत नसल्याने परिणामी लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. भविष्यात शेतकऱ्यांचे पाण्याविना हालदेखील होण्याचे भाकीत असल्याने सदरच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय. आर. पाटील यांनी केली आहे.

तत्कालीन युती सरकारच्या कार्यकाळात पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेच्या माध्यमातून सर्वत्र शेतशिवारांमधून येणाऱ्या लहान मोठ्या नाल्यांवर बंधारे बांधण्याच्या संकल्पना राबविण्यात आल्या होत्या. जेणेकरून बंधाऱ्यांची बांधणी झाल्यास शेतकऱ्यांना अडवलेल्या पाण्याचा त्यांच्या रब्बी पिकांना उपयोग करता येईल व जणावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मिटेल.

हेही वाचा: औरंगाबाद : कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीत १८१८ कोटी माफ

नैसर्गिक प्रवाहाचे पाणीसुध्दा जमिनीमध्ये जिरवले जाईल. त्यामुळे बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांना फायदादेखील झालेला आहे. मात्र बहुतेक ठिकाणी पाटबंधारे अभियंत्यांचे दुर्लक्ष व त्यांच्या नाकर्तेपणामुळे ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे बांधकामे केल्याने शासनाचा चांगला उद्देश सफल होऊ शकला नाही. त्याच दृष्टिकोनातून भुसावळ तालुक्यातील जाडगाव गावालगत विल्हाळे तलावातील सांडव्याच्या नाल्यामधून वाहून जाणारे लाखो लीटर पाणी अडवता येईल.

पाणी असून उपयोग नाही

यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने नाल्यामध्ये पाण्याचा चांगला साठा आहे. पाणी अडवण्याच्या ‘फायबर प्लेट’ला स्वतंत्र जागा तयार करावी लागते. मात्र ठेकेदाराने त्या प्लेट काँक्रीटमध्ये बसवून बंधारा सुरू केला व पाटबंधारे अभियंत्यांच्या मार्गदर्शनात सर्वे बिलदेखील काढून घेतले आहे. परंतु आज रोजी बंधाऱ्यावरील प्लेट्स सडल्या आहेत. सर्व पाणी वाहून जात आहे. नवीन प्लेट बसवल्या जात नाही. परिणामी रब्बीच्या हंगामात पाणी असून उपयोग होत नाही शासनाची पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना या ठिकाणी फोल ठरत आहे.

loading image
go to top