ZP अन् पालिकांचे नवे सदस्य ठरवणार आमदार; 6 महिन्यांत होणार निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP

ZP अन् पालिकांचे नवे सदस्य ठरवणार आमदार; 6 महिन्यांत होणार निवडणूक

जळगाव : प्रतिष्ठा अन्‌ चुरशीसह ‘अर्थ’पूर्ण लढतीची परंपरा लाभलेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी सहा महिन्यात निवडणूक होतेय.. पण, त्याआधी जिल्हा परिषदेसह १४ नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होणार असून त्यात निवडून येणारे सदस्य या जागेसाठीचा आमदार ठरविणार आहे.

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आलेले आमदार चंदू पटेल यांची मुदत येत्या ऑक्टोबरमध्ये संपत आहे. त्यामुळे या जागेसाठी येणाऱ्या सहा महिन्यांत निवडणूक होणार आहे.

हेही वाचा: ग्रामसेवकासह सरपंचपतीस 6 हजारांची लाच भोवली

‘अर्थ’पूर्ण परंपरा

जळगावातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ही जागा निवडून द्यायची असून आतापर्यंतचा इतिहास पाहता ही निवडणूक नेहमीच अत्यंत रोमांचक, चुरशीची व ‘अर्थ’पूर्ण झाली आहे. तत्कालीन प्रतिस्पर्धी डॉ. गुरुमुख जगवानी व ए.टी. पाटील, मनीष जैन व निखिल खडसे, चंदू पटेल व विजय भास्करराव पाटील अशा ‘हेवीवेट’ लढतींचा या निवडणुकीला इतिहास आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून असते.

त्याआधी पालिका निवडणुका

अर्थात, या निवडणुकीच्या आधी जिल्हापरिषद, पंचायत समिती व जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होतील. या निवडणुकांमध्ये निवडून येणारे नवनिर्वाचित सदस्य विधान परिषदेचा नवा आमदार ठरविणार आहेत.

सुमारे सातशे मतदार

पालिकांच्या हद्दीतील प्रभागांची पुनर्रचना, हद्दवाढीनुसार वाढलेली संख्या, जिल्हा परिषद सदस्यांची प्रस्तावित वाढीव संख्या असे सुमारे सातशे सदस्य या निवडणुकीसाठीचे मतदार असतील. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीपेक्षा विधान परिषदेसाठी या वेळी तब्बल ६० पेक्षा अधिक मतदार वाढलेले आहेत. नवनिर्वाचित सदस्यांसह स्वीकृत सदस्य अशी ही एकूण मतदार संख्या जवळपास ६९४ झालीय.

हेही वाचा: Jalgaon : चोरटी वाळू वाहतूक प्रकरणी ट्रक चालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पाचशेवर नवे सदस्य येणार निवडून

जिल्ह्यात येणाऱ्या काळात जिल्हापरिषद, पंचायत समितीसह १४ पालिकांची निवडणूक होणार आहे. या सर्व संस्थाची मुदत याआधीच संपली असून त्यावर प्रशासकांचा कारभार सुरु आहे. जिल्हापरिषदेतून नव्याने वाढ झालेल्यांसह ७७, पंचायत समिती सभापती १५ व पालिकांमधून निवडून येणारे ४३३ नवे सदस्य असे एकूण ५२५ नवनिर्वाचित सदस्य विधान परिषदेसाठीचे मतदार होतील व या जागेसाठीची आमदारकी ठरवतील.

या पालिकांची निवडणूक

जळगाव महापालिकेसह जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड, शेंदुर्णी वगळता जिल्हा परिषदेसह अन्य पालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यात भुसावळ, अमळनेर, पाचोरा, यावल, रावेर, फैजपूर, सावदा, पारोळा, एरंडोल, चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, वरणगाव, नशिराबाद या पालिका व नगरपरिषदांचा समावेश आहे.

पालिकांचे चित्र असे

पालिका---- सदस्य---वाढ--स्वीकृत--एकूण

भुसावळ----४८---२----३---५३

अमळनेर----३५---१----३---३९

पाचोरा------२७---१----२---३०

चोपडा------२९----२---३---३४

चाळीसगाव---३५---१---३---३९

जामनेर------२५----०---२---२७

यावल ------२१----२---२---२५

रावेर--------१८----४----२---२४

फैजपूर-------१८----३---२---२३

सावदा------१८----२----२---२२

पारोळा-----२१-----३----२---२६

एरंडोल-----२१----२----२----२५

धरणगाव----२१---२----२----२५

वरणगाव----१८---३----२-----२३

भडगाव-----२१----३---२----२५

मुक्ताईनगर---१८----०---२----२०

शेंदुर्णी------१८----०---२----२०

बोदवड-----१७----०---२----१९

नशिराबाद ---२०----०--२----२२

जळगाव मनपा--७५---०--५---८०

एकूण ------५२४---३१--४७---६०२

हेही वाचा: जमावाच्या हाणामारीत आईचा मृत्यु; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

असे असतील मतदार

पालिका सदस्य : ६०२

जिल्हापरिषद सदस्य : ७७

पं.स. सभापती : १५

एकूण : ६९४

Web Title: Mla To Decide New Members Of Zp And Municipalities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top