महापालिकेचा रस्त्याच्या कामासाठी नवा ७० कोटींचा आराखडा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेचा रस्त्याच्या कामासाठी नवा ७० कोटींचा आराखडा 

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक भागांत नागरिकांना रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

महापालिकेचा रस्त्याच्या कामासाठी नवा ७० कोटींचा आराखडा 

जळगाव : शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे मक्तेदार काम करण्यास तयार नसल्यामुळे महापालिका अडचणीत आली आहे. त्यासाठी आता महापालिकेने रस्ता दुरुस्तीसाठी नवीन आराखडा तयार केला असून, शहरातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी आता एकच मक्तेदार नियुक्त करण्यात येणार आहे. 

आवश्य वाचा- मृत्यूची प्रतीक्षा करताय का? जळगावकर संतप्त !
 

नागरिक संतप्त, विरोधकांचे आंदोलन 
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक भागांत नागरिकांना रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागांत वाहने खड्ड्यांत पडून अनेकांना दुखापतही झाली आहे. विरोधकांनी रस्त्यातील खड्डे बुजवावेत, या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले आहे. मेहरूण भागात विरोधकांनी केक कापूस खड्ड्यांचा वाढदिवसही साजरा केला. 

महापालिकाही अडचणीत 
रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढण्यात आल्या, मक्तेदाराने निविदा घेतल्या. त्या मंजूर करून त्यांना कामाचे आदेशही देण्यात आले. परंतु त्या मक्तेदारांनी काम सुरू केलेले नाही. त्यामुळे महापालिका अडचणीत आली आहे. मक्तेदारांना नोटीस देण्याचे कामही आता महापालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. 

नगरसेवकांचे साटेलोटे 
प्रभागातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामात मक्तेदारासोबत नगरसेवकांचेही साटेलोटे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक प्रभागातील कामेही अडकली असल्याचे दिसून आले आहे. प्रभागातील नगरसेवक आणि मक्तेदारांची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने पर्याय शोधणे सुरू केले आहे. 

आवश्य वाचा- पाच वर्षांनी एकमेकांना दिले आलिंगन..उपस्थितांच्या डोळ्यात आले पाणी 
 

आता शहरासाठी एकच मक्तेदार 
महापालिकेने आता रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी आता ७० कोटी रुपयांचा नवीन आराखडा तयार केला आहे. प्रत्येक प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मार्च २०२१ अखेर शहरातील काही प्रभागांतील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील टप्पा मार्च २०२१ नंतर असणार आहे. त्यासाठी १५० कोटी रुपयांचे नियोजन करण्यात येणार आहे. मात्र आता रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रभागनिहाय न काढता संपूर्ण शहरासाठी एकच मक्तेदार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी ७० कोटी रुपयांच्या निविदा तयारही करण्यात आल्या आहेत. त्या लवकरच काढण्यात येणार आहेत. 


शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रभागातील मक्तेदार काम करण्यास ऐनवेळी तयार होत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होतात. त्याकरिता आता शहरातील सर्व प्रभागांतील खड्डे बुजविण्यासाठी आता एकच मक्तेदार नियुक्त करण्याबाबत प्रस्ताव आयुक्तांना देण्यात आला आहे. 
-सुरेश भोळे, 
आमदार, जळगाव शहर  

 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top