जळगावत पून्हा होणार कचरा कोंडी; वेतनाअभावी सफाई कामगारांचे ‘कामबंद’ 

सचिन जोशी
Friday, 25 December 2020

७० कोटी, म्हणजे दरमहा सुमारे साडेपाच-सहा कोटींचा खर्च केवळ दहा प्रभागांमध्ये होऊनही स्वच्छतेचा प्रश्‍न सुटलेला नसून नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारी कायम आहेत.

जळगाव  : ‘वॉटरग्रेस’चा सफाई मक्ता अनेक कारणांवरून वादात अडकलेला असताना आता काही दिवसांपासून सफाई कामगारांनी काम बंद केले आहे, तर दुसरीकडे घंटागाड्यांच्या नियमित फेऱ्याही घटल्या आहेत. कामगारांचे वेतनच होत नसल्याने ही स्थिती उद्‌भवल्याचे सांगितले जात आहे. 

शहरातील स्वच्छतेचा कधीही न सुटलेला प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने बरीच बोंबाबोंब झाल्यानंतर ‘वॉटरग्रेस’ या नाशिकस्थित कंपनीला १९ पैकी दहा प्रभागांतील स्वच्छतेचा ठेका देण्यात आला. उर्वरित नऊ प्रभागांमध्ये महापालिकेच्या सफाई कामगारांकडून स्वच्छता करून घेण्याचे धोरण ठरले आहे. 

सुरवातीपासून तक्रारी 
७० कोटी, म्हणजे दरमहा सुमारे साडेपाच-सहा कोटींचा खर्च केवळ दहा प्रभागांमध्ये होऊनही स्वच्छतेचा प्रश्‍न सुटलेला नसून नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारी कायम आहेत. वारंवार याबाबत ओरड होऊन, महासभांमध्ये विषय उपस्थित होऊन, वादंग होऊनही सफाईचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. उलटपक्षी, आता या ठेक्यात नगरसेवकच पैशाची पाकिटे घेत असल्याचे आरोप जाहीरपणे होऊ लागले आहेत. 

नियमितता नाही 
नागरिक, नगरसेवकांमधून स्वच्छतेबाबत ओरड झाली, की तेवढ्यापुरते सफाईचे कामकाज चालते. पुढे ‘जैसे थे’ स्थिती होते. सफाईच्या कामात नियमितता नाही. आता तर ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटारींच्या कामासाठी शहरातील जवळपास सर्वच रस्ते खोदले गेल्यानंतर या रस्त्यांची सफाई होत नसल्याचे चित्र आहे. तरीही, ‘वॉटरग्रेस’च्या ठेक्यावर खर्च सुरूच आहे. 

कामगारांचे वेतन नाही 
गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्यांच्या फेऱ्याही नियमित होत नसून सफाई कामगार १५ दिवसांपासून कामावर येत नसल्याचे चित्र आहे. यामागचे कारण शोधले असता कामगारांना वेतनच मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जी काय स्वच्छता होत होती, तीदेखील ठप्प झाली असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमले आहेत. 

मक्तेदारच गायब..? 
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात संशयित म्हणून व्यावसायिक सुनील झंवरचे नाव समोर आले असून, वॉटरग्रेसच्या ठेक्यात झंवरची भागीदारी असल्याचेही बोलले जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर प्रकरणात चौघांना ताब्यात घेतल्यापासून झंवर गायब असून, त्यामुळे ‘वॉटरग्रेस’चा स्थानिक उपकंत्राटदार म्हणून झंवरचा हा ठेकाच अडचणीत आला आहे, तर दुसरीकडे महापौरांनीही सफाईच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ठेक्याच्याच चौकशीची मागणी आयुक्तांकडे केल्याने या ठेक्याचे व पर्यायाने शहराच्या स्वच्छतेचे भवितव्य कचऱ्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 

 

स्वच्छतेच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त होत असून, प्रत्यक्ष पाहणीतूनही काही बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे वॉटरग्रेसअंतर्गत चालणाऱ्या कामाचा आढावा घेऊन, चौकशी करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे केली आहे. 
-भारती सोनवणे, महापौर 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news jalgaon sweepers work strike salary