Latest Marathi News | थकीत गाळेधारकांनी २५ टक्के रक्कम भरावी महापालिकेचे आदेश; अन्यथा जप्तीची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rent Money

थकीत गाळेधारकांनी २५ टक्के रक्कम भरावी महापालिकेचे आदेश; अन्यथा जप्तीची कारवाई

जळगाव : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे भाड्याची रक्कम थकीत आहे. यांपैकी थकीत २५ टक्के रक्कम भरावी, असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे ज्यांनी ही रक्कम भरली नसेल त्यांनी ती त्वरीत भरावी अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा आदेश महापालिकेतर्फे देण्यात आला.

महापालिकेची २६ व्यापारी संकुले आहेत. त्यातील दोन हजार २३३ गाळेधारकांची कराराची मुदत संपलेली आहे, त्यांच्याकडे महापालिकेच्या भाड्याची रक्कम थकीत आहे. करार संपलेल्या गाळ्यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यासाठी लिलाव करण्याचा ठराव (क्रमाक ४५८) महापालिकेच्या महासभेने मंजूर केला होता.

मात्र त्यावर गाळेधारकानी अपील केल्यामुळे शासनाने या ठरावाला स्थगिती दिली होती. महासभेतही यावर चर्चा झाली होती. तत्कालीन नगरविकासमंत्र्यांनी ठरावाला स्थगिती दिली असली, तरी भाडेवसुलीच्या रकमेस स्थगिती न देता गाळेधारकांनी आपल्या थकीत रकमेपैकी २५ टक्के रक्कम भरावी, असे आदेश दिले होते.(Municipal Corporation order to pay 25 percent amount to arrears Otherwise confiscation proceedings jalgaon news)

हेही वाचा: Bogus Medical Certificate Case : डॉ. सैंदाणे यांना 5 दिवसांची कोठडी

त्यामुळे अनेक गाळेधारकांनी ही रक्कम भरली आहे. मात्र अनेकांकडे ही रक्कम थकीत असून, त्यांनी २५ टक्केही रक्कम भरलेली नाही. त्यामुळे महापालिकेने या रकमेच्या वसुलीचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी याबाबत महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांची बैठक नुकतीच घेतली. त्या वेळी व्यापारी उपस्थित होते. उपायुक्त पाटील यांनी सर्व थकीत भाड्याच्य २५ टक्के वसुलीबाबत कोणतीही स्थगिती नाही, त्यामुळे ज्यांनी ही रक्कम भरलेली नाही त्यांनीही ती त्वरित भरावी, असे आवाहन केले. रक्कम भरली नाही तर संबंधितावर गाळेजप्तीची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम थकीत आहे. थकीत रकमेच्या २५ टक्के रक्कम जमा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे आता महापालिका ही रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार आहे. यात गाळेजप्तीची कारवाई करण्यात येईल.

-प्रशांत पाटील,

उपायुक्त, महापालिका, जळगाव

हेही वाचा: Relationship: काही पुरुष बायकोला का घाबरतात?