यादीत नाव न आल्याने धक्का बसला आणि मृत्यू झाला; मग काय संतप्त नातेवाईक मृतदेहासकट पालिकेत धडकले

विनोद शिंदे
Wednesday, 13 January 2021

पुढच्या यादीत नाव येईल म्हणून दिलासा दिला. मात्र, पात्रता यादीत नाव नसल्याने बापू जाधव यांना नैराश्य आले.

चाळीसगाव  ः शासनातर्फे पात्र ठरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या यादीत आपले नाव नसल्याने येथील पालीकेतील सफाई कर्मचारी बापू त्र्यंबक जाधव (वय ५५) यांना धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या प्रकाराने संतप्त कुटुंबीयांसह सफाई कर्मचाऱ्यांनी मयत जाधव यांचा मृतदेह थेट पालीकेत आणला.

आवश्य वाचा- ‘अंकल रायसोनी ॲन्ड गँग’ला सर्व आरोप अमान्य; राज्यभर ८१ गुन्हे !

सुमारे ४० वर्षांपासून हे कर्मचारी काम करीत आहेत. मात्र, त्यांना अद्यापही कायम केले जात नाही असे सांगून आणखी किती जणांचे बळी घेणार? असा संतप्त सवाल मयत जाधव यांच्या कुटुंबियांनी केला. जोपर्यंत मयताच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह नेणार नाही, असा पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच सर्वांनी ठिय्या दिला. अखेर मृताच्या कुटुंबीयांना तातडीची पाच लाखांची मदत देण्यासोबतच कुटुंबातील एका सदस्याला पालीकेत नोकरी देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह घरी नेला. 

येथील पालिकेत सुमारे ११९ सफाई कर्मचारी गेल्या ४० वर्षांपासून काम करीत असताना त्यांना अजूनही कायम केलेले नाही. शासनाने यापैकी केवळ ४० कर्मचाऱ्यांनमा पात्र ठरवले. या पात्र कर्मचाऱ्यांमध्ये बापू त्र्यंबक जाधव (वय ५५) यांचे नाव नव्हते. त्याचा जाधव यांना धक्का बसला. यासंदर्भात त्यांनी उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांची समजूत घालत पुढच्या यादीत नाव येईल म्हणून दिलासा दिला. मात्र, पात्रता यादीत नाव नसल्याने बापू जाधव यांना नैराश्य आले. आज पहाटे सहाला नेहमीप्रमाणे उठून प्रभागात कामाला गेले व त्या ठिकाणी त्यांनाम अचानक उलटी झाली. डॉक्टरांनी त्यांना तपासून घरी जाऊन आराम करण्यास सांगितले. घरी येत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. 

कुटुंबीयांचा संताप 
घडलेल्या प्रकाराने जाधव कुटुंबीयांसह सफाई कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत थेट नगरपालिका कार्यालय गाठले व मयत जाधव यांचा मृतदेह घेऊन मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या दालनात जाऊन आणखी किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार? असा जाब विचारला. सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून मृत जाधव यांनी शहरासाठी आपले आयुष्य घातले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयास तातडीने मदत देऊन त्यांच्या वारसाला नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांना कायमच्या ऑर्डरी मिळाल्या तर काही कर्मचारी पात्र असतानाही त्यांना कायम केलेले नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

वाचा- आयुक्त साहेब ! अन्यथा तुमच्यावर गुन्हा; शिवसेना नगरसेवकांचा हल्लाबोल

 

तातडीची केली मदत 
मृत कर्मचारी बापू जाधव यांच्या कुटुंबीयांना पालीकेतर्फे तातडीची ५ लाख रूपयांची मदत जाहीर करुन त्यापैकी २ लाखांचा धनादेश तत्काळ देण्यात आला. तर उर्वरीत तीन लाख रूपये पालीकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडून मंजुरी घेऊन दिले जातील असे आश्‍वासन पालिकेतर्फे देण्यात आले. जाधव कुटुंबातील वारसाला नोकरीत सामावून घेण्यासाठी विशेष बाब म्हणून मंत्रालयात प्रस्ताव पाठवू व त्याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन दिल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी दुपारी दीडला ठिय्या आंदोलन मागे घेत मृतदेह घरी नेला. 

दिरापाठोपाठ भावजाईचाही मृत्यू 
दरम्यान, आज सकाळी रोजंदारी कामगार बापू जाधव यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर बापू जाधव यांच्या नात्याने भावजाई असलेल्या पुष्पाबाई जाधव या दारावर आल्या. त्या देखील पालिकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवेत होत्या. मात्र, त्यांचे वयोमान झाल्याने सध्या कामावर नव्हत्या. त्यांच्या बाबतीत देखील नोकरीच्या संदर्भात असाच प्रसंग आलेला असल्याने त्या आपबिती कथन करताना भावूक झाल्या होत्या. अशातच त्यांचीही तब्येत बिघडली व काही वेळात त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal marathi news chalisgaon employee deaths not name permanent list