Latest Marathi News | जागर स्त्रीशक्तीचा महिला स्वयंपूर्णतेच्या ऊर्जेचे प्रतीक बनली ‘पिंक रिक्षा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pink Riksha Drivan by women

जागर स्त्रीशक्तीचा : महिला स्वयंपूर्णतेच्या ऊर्जेचे प्रतीक बनली पिंक रिक्षा

जळगाव : स्त्रीशक्तीचा जागर म्हणून नवरात्रोत्सव साजरा होतो. या उत्सवातच मराठी प्रतिष्ठानच्या कल्पनेतून, शहरातील दात्यांच्या मदतीतून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संकल्प सोडण्यात आला. आतापर्यंत पाच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनण्यासाठी ‘पिंक रिक्षा’ने ऊर्जा दिली. जळगाव जनता बँकेच्या योजनेतून आणखी दहा महिला याच उपक्रमांतर्गत ‘सिंधू भरारी’ घेण्यासाठी सज्ज आहेत.

शासनाच्या अबोली रिक्षा योजनेतून प्रेरणा घेत मराठी प्रतिष्ठानने तीन वर्षांपूर्वी महिलांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी रिक्षा चालविली पाहिजे, अशी संकल्पना पुढे आणली आणि ती यशस्वी करून दाखविली. (navratri 2022 pink rickshaw became symbol of energy of female self sufficiency jalgaon)

हेही वाचा: नवरात्रोत्सवात अधिकृत वीजजोडणी घ्या; MSEDCLचे दुर्गोत्‍सव मंडळांना आवाहन

पाच महिलांच्या हाती ‘स्टिअरिंग

तीन वर्षांपूर्वी शहरातील पाच महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण दिले. डाउन पेमेंटसाठी समाजातील दानशूरांची मदत घेतली आणि उर्वरित रकमेचा अर्थपुरवठा युनियन बँकेने केला. परिणामी, शहरातील विविध रस्त्यांवर पाच महिला चालकांच्या हाती ‘पिंक’ रिक्षाचे स्टिअरिंग आले आणि त्यांच्या कुटुंबाच्या त्या ‘कर्त्या’ बनल्या. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांत या पाचही महिलांच्या कर्जाचा एकही हप्ता थकलेला नाही

आणखी दहा भगिनी सज्ज

नवरात्रोत्सवाच्या जागरात या उपक्रमासाठी म्हणून आता दहा भगिनी सज्ज होतायत. मराठी प्रतिष्ठानने त्यासाठी दहा महिलांना प्रशिक्षित केलेय, पैकी दोघी धरणगाव व चोपड्यातील, तर उर्वरित आठ महिला जळगाव शहरातील आहेत. या दहा महिलांच्या रिक्षांसाठी विविध दानशूरांनी डाउनपेमेंट दिले आहे. प्रत्येक रिक्षासाठी ९० टक्के कर्जपुरवठा सवलतीच्या व्याजदरात जळगाव जनता सहकारी बँक ‘सिंधू भरारी’ योजनेंतर्गत करणार आहे. विशेष म्हणजे पुढील सहा महिने या महिलांना हप्ता भरावा लागणार नाही. मंगळवारी (ता. २७) या रिक्षा प्रदान करण्याचा कार्यक्रम जळगाव जनता सहकारी बँकेच्या सेवा मुख्य कार्यालयात सकाळी होणार आहे.

या उपक्रमांतर्गत महिलांना १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. रिक्षा प्रदान केल्यानंतर त्यांचे ‘केअर टेकर’ म्हणूनही प्रतिष्ठान काम करते. जिल्ह्यात पाचशे ‘पिंक रिक्षा’ सुरू करण्याचे आमचे ध्येय आहे, असे जमील देशपांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: Emma Lamb : 'या' क्रिकेटपटूच्या सौंदऱ्यापुढे मॉडेलही पडेल फिकी