जळगाव : नियम मोडला एकाने दंडाचा भुर्दंड दुसऱ्याला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police

जळगाव : नियम मोडला एकाने दंडाचा भुर्दंड दुसऱ्याला

जळगाव - शहर वाहतूक शाखेतर्फे सद्या ऑनलाइन मेमो पद्धतीचा अवलंब केला जात आहे. अगदी फोटो पुराव्यासह येणाऱ्या या मेमोमध्येही आता गडबड होऊ लागली आहे. शिवाजीनगरातील एका गृहस्थाला चक्क वेगळ्याच व्यक्तीच्या नावे नियम मोडल्याचा दंड भरण्याची नोटीस वाहतूक विभागाने पाठवल्याने वाहनधारक चक्रावले आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांना पूर्वी रस्त्यावर थांबवून दंडाचा मेमो दिला जात होता. सिग्नल मोडणे, ट्रिपलसीट वाहन चालवणे, लायसन्स नसणे, कागदपत्रे नसणे अशा विविध कारणांसाठी वाहतूक विभाग पूर्वी शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत दंड आकारत होते. वाहतूक सिग्नलवर उभा पोलिस कर्मचारी संबंधित वाहनचालकाला थांबवून हाताने लिहिलेला मेमो देत होता. आता वाहतूक विभागातर्फे चक्क वाहनधारकांचे फोटो काढून ते कार्यालयास पाठवली जातात. तेथून वाहनावरील नंबरवरुन वाहन मालकाच्या पत्त्यावर दंडाचा मेमो आणि नियम मोडल्याच्या दिवसाचा तो, फोटोही असतो. असाच एक मेमो गुरुवारी (ता. ५) शिवाजीनगर उस्मानिया पार्क येथील रहिवासी शेख मोहम्मद शफी यांना आला. दंडाचा मेमो त्यांनी स्वीकारलाही मात्र, त्यावरील फोटो वेगळ्याच वाहनाचा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

वाहनाचे रंगरूपही वेगळे

वाहतूक कर्मचारी मुकुंद बागलाने यांनी काढलेल्या फोटोतील वाहन बजाज कंपनीचे असून ज्यांच्या नावे एक हजार रुपयांचा मेमो पाठवण्यात आला आहे, त्यांच्याकडे हिरोची पॅशन गाडी आहे. गाडीचा रंगही वेगळा असून दंड झालेले वाहन नवेकोरे असून डीक्कीही लावलेली नाही.

लोकन्यायालयाची नोटीसही

शेख मोहम्मद शफी यांना एक हजार रुपयांच्या चलनासह शहर वाहतूक शाखेने चक्क लोक न्यायालयाची नोटीसही पाठवली आहे. त्यात नमुद केल्याप्रमाणे, शेख शफी यांच्यावर कलम १९(५) अन्वये दाखलपूर्व खटला म्हणून निवाड्याकरीता ७ मे रेाजी लोकन्यायालयात हजर राहण्याचे सुचवण्यात आले आहे.

Web Title: One Who Breaks Rules Is Fined Other In Jalgaon City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top