
Jalgaon Bribe News : निरीक्षकांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
जळगाव : अमळनेर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक तथा एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विद्यमान प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह सात पोलिस कर्मचारी व इतर १३ जणांविरुद्ध तीन दुकानदारांना बेकायदेशीररीत्या पोलिस ठाण्यात डांबून ठेवत खंडणी (Bribe) वसुली व दुकाने जमीनदोस्त करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अमळनेर सत्र न्यायालयाने दिले होते. (Order to register case against 13 persons including inspector in bribe case jalgaon crime news)
त्या आदेशाची प्रत स्वतः स्थानिक गुन्हेशाखेकडे सोपवून त्यांना अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगावे, असे आदेश न्यायाधीश चौधरी यांनी शुक्रवारी (ता. १४) आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर सरकारी वकिलांना दिले आहेत.
श्री. हिरे हे अमळनेरला निरीक्षक असताना ९ मार्च २०२२ला तेथील बसस्थानकाजवळील खासगी जागेवरील दुकानदारांना बेकायदेशीरपणे २८ तास डांबून ठेवत त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचे हे प्रकरण होते. याबाबत पीडित व्यापाऱ्यांनी अॅड. नितीन भावसार यांच्या मार्फत न्यायालयात खटला दाखल केला होता.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
त्यावर गुरुवारी (ता. २३) न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या देखरेखित केला जावा, असे आदेशात नमूद केले आहे. या तब्बल २२ पानी आदेशाची अधिकृत प्रत न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्यावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या केल्या. तसेच, ॲड. बागूल यांना एक प्रत सोपवित स्थानिक गुन्हे शाखेला स्वतः नेऊन द्यावी व त्यांना अमळनेर येथे येऊन गुन्हा दाखल करण्यास सांगावे, असे आदेश दिल्याची माहिती ॲड. बाविस्कर यांनी दिली.