फुले मार्केट अतिक्रमणावर तोडगा काढणार : महापालिका आयुक्त विद्या गायकवाड | Latest Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Commissioner Vidya Gaikwad reviewing encroachment proceedings in Phule Market

फुले मार्केट अतिक्रमणावर तोडगा काढणार : महापालिका आयुक्त विद्या गायकवाड

जळगाव : शहरातील फुले मार्केटमधील अतिक्रमण (Encroachment) हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १२) पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाल्याची माहिती मिळताच आयुक्तांनी (JMC Commissioner) अचानक पाहणी केली, मात्र त्या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण आढळून आले नाही.

या मार्केटमधील अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर लवकरच अतिक्रमणधारक व दुकानदार यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. (Phule market encroachment will be resolved Jalgaon Municipal Commissioner Vidya Gaikwad Jalgaon Latest Marathi news)

फुले मार्केटमधील अतिक्रमणाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत, शिवाय महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी पदाधिकारी व विरोधी गटाच्या सदस्यांनी या अतिक्रमणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई सुरू केली. सोमवारी (ता. ११) मार्केटमधील संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले होते.

आयुक्ताची अचानक पाहणी
फुले मार्केटमध्ये अतिक्रमण पुन्हा होवू नये, यासाठी महापालिकेतर्फे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सद्या तैनात करण्यात आले आहेत, त्यामुळे मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण झाले नाही.

परंतु फुले मार्केटमध्ये पुन्हा अतिक्रमण झाल्याच्या माहितीचा फोन कुणीतरी आयुक्तांना केला, त्यामुळे आयुक्त विद्या गायकवाड यांनी दुपारी अचानक फुले मार्केटला भेट देत पाहणी केली, त्यावेळी त्या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण आढळून आले नाही.

कायमस्वरूपी तोडगा काढणार

फुले मार्केटमध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी उपस्थित असल्यानंतर अतिक्रमणधारक येत नाहीत, मात्र ते दुसरीकडे कारवाई करण्यास गेल्यानंतर या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होते.

त्यामुळे अतिक्रमणधारक व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी यांचा लपंडाव सुरू होतो. त्यामुळे या अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमणधारक, फुले मार्केटचे दुकानदार यांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.