जळगाव मनपात महापौर, उपमहापौरांना मिळणार मुदतवाढ ! पण ‘सांगली पॅटर्न’चा धोका 

सचिन जोशी
Friday, 5 March 2021

महापौर भारती सोनवणेंचा कार्यकाळ कोरोनाच्या स्थितीत त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे गाजला..

जळगाव: कोरोना संसर्गाच्या काळातही चांगली कामगिरी केली म्हणून कार्यकाळ संपत असलेल्या महापौर व प्रभाग दौऱ्यासह दरबारातून जनतेपर्यंत पोचलेल्या उपमहापौरांना सहा महिन्यांसाठी का होईना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, सांगलीत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असतानाही बसलेल्या धक्क्याचा धोकाही यामागचे कारण असू शकते, असेही बोलले जात आहे. 

आवर्जून वाचा- जळगाव शहरात लवकरच स्वयंचलित प्रदूषण नोंद यंत्रणा 
 

शहराच्या विद्यमान महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडकेंचा कार्यकाळ येत्या १७ मार्चला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या महापौर, उपमहापौरांच्या निवडीचे वेध लागले आहे. महापालिकेत ५७ सदस्यांच्या स्पष्ट बहुमतासह सत्तेत असलेल्या भाजपमध्ये त्यासाठी अनेकांची नावे चर्चेत असून, त्यांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. 

यांची नावे चर्चेत 
महापौरपद महिलेसाठी राखीव असल्याने त्यासाठी ज्योती चव्हाण, प्रतिभा कापसे यांच्या नावांची चर्चा आहे. तर उपमहापौर पदासाठी गटनेते भगत बालाणी, चेतन सनकत व अन्य नावे चर्चिली जात आहेत. अद्याप यापैकी कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. 

दोघांना मिळणार मुदतवाढ 
असले असले तरी महापौर भारती सोनवणेंचा कार्यकाळ कोरोनाच्या स्थितीत त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे गाजला. लॉकडाउन असो की रुग्णसंख्येचे ‘पीक’ या दोन्ही पातळीवर महापौर रस्त्यावर उतरून काम करताना दिसल्या. तर उपमहापौर खडकेंनीही प्रभागदौरे करत समस्या जाणून घेतल्या व जनता दरबारातून काही प्रश्‍न सोडविण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे त्याआधारे त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

आवर्जून वाचा- दक्षीण भारतात हे आहेत प्रसिध्द शिवालय; जेथे शिवभक्तांची राहते गर्दी
 

‘सांगली पॅटर्न’चा धोका 
महापौर, उपमहापौरांच्या कामगिरीची बाजू उजवी असली तरी सध्याच्या अनिश्‍चिततेच्या स्थितीत त्यांनी राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्याचा धोका परवडणार नाही, असेही काहींचे मत आहे. सांगलीत भाजपचे बहुमत असताना गेल्या आठवड्यात झालेल्या महापौर, उपमहापौर निवडीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी निवडून आले. तसा धोका जळगावात पत्करू नये, अशी काहींची भूमिका असल्याने त्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळू शकते, असाही चर्चेचा सूर आहे. 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi news jalgaon bjp jalgaon municipal corporation mayor deputy mayor term extension danger sangli patton