esakal | जळगाव शहरात लवकरच स्वयंचलित प्रदूषण नोंद यंत्रणा 

बोलून बातमी शोधा

जळगाव शहरात लवकरच स्वयंचलित प्रदूषण नोंद यंत्रणा }

दीड कोटीच्या निधीतून महापालिकेची शाळा, रुग्णालय अथवा महापालिका इमारतीवर प्रदूषण नोंदीची यंत्रणा बसेल.

जळगाव शहरात लवकरच स्वयंचलित प्रदूषण नोंद यंत्रणा 
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने होणारी हवेतील प्रदूषणाची नोंद आता लवकरच स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणार असून, आपल्या शहराच्या हवेतील घटकांमध्ये कोणत्या स्वरूपाचे किती प्रदूषणकारी घटक आहेत, ते सार्वजनिकरीत्या ‘डिस्प्ले’ही होणार आहेत. 

जळगाव शहरातील प्रदूषणातील घटक मोजण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तीन ठिकाणी यंत्रे लावण्यात आली आहेत. बी. जे. मार्केट, गिरणा टाकी परिसर व एमआयडीसीत प्रदूषणाच्या मॅन्युअली नोंदी घेतल्या जातात. या यंत्रणेद्वारे हवेतील नायट्रोजन ऑक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड आणि धुलिकणांचे प्रदूषण किती, याबाबत नोंदी घेतल्या जातात. तासनिहाय, दिवसनिहाय आणि महिना व वार्षिक सरासरी अशा नोंदी होतात. सध्या जळगाव शहरातील वातावरणात धुळीचे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

आता स्वयंचलित यंत्रणा 
अर्थात, मॅन्युअली प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जात असल्याने या नोंदींच्या अचूकतेबाबत संभ्रम होता. आता लवकरच जळगाव शहरात स्वयंचलित प्रदूषण नोंद यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दीड कोटीचा निधीही मंजूर केला आहे. 

सार्वजनिक ठिकाणी ‘डिस्प्ले’ 
या दीड कोटीच्या निधीतून महापालिकेची शाळा, रुग्णालय अथवा महापालिका इमारतीवर प्रदूषण नोंदीची यंत्रणा बसेल. याठिकाणी होणारी नोंद शिवतीर्थ चौकात मोठ्या डिजिटल बोर्डवर ‘डिस्प्ले’ होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही शहरातील हवेतील प्रदूषित घटक, त्याचे प्रमाण यातून समजणार आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जळगाव उपविभागीय अधिकारी सोमनाथ कुरमुडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.