पुरंदरे... सर्वांचेच ऊर्जास्रोत, कार्यही प्रेरणादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदरे... सर्वांचेच ऊर्जास्रोत, कार्यही प्रेरणादायी

पुरंदरे... सर्वांचेच ऊर्जास्रोत, कार्यही प्रेरणादायी

जळगाव : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना व्यापक स्वरूपात घराघरांत पोचविणारे बाबासाहेब पुरंदरे सर्वांचेच ऊर्जास्रोत असून, त्यांचे कार्यही प्रेरणादायी आहे, अशा भावना बाबासाहेबांच्या संपर्कात आलेल्या जळगावातील व्यक्तींनी व्यक्त केल्या.

बाबासाहेब विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जळगावी येऊन गेले आहेत. १९९२-९३ मध्ये अनिल राव अभाविपचे शहराध्यक्ष असताना बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यानमाला आयोजित केली होती. १९९६ मध्ये विवेकानंद प्रतिष्ठानने ‘जाणता राजा’चे प्रयोग आयोजित केले. त्यातून शाळा उभारली. नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने १९९८- ९९ मध्ये कार्यालय उभारण्यासाठी म्हणून हे महानाट्य जळगावी आणले. त्यानंतरही चोपड्यातील पंकज समूहाने जाणता राजा महानाट्याचे प्रयोग जळगावात आयोजित केले होते. चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित २००४ च्या बालगंधर्व संगीत महोत्सव उद्‌घाटनाला पुरंदरेंचा परिसस्पर्श झाल्याचाही अनुभव आहे. या प्रत्येक वेळी श्री. पुरंदरे जळगावी आले व या खानदेशच्या पवित्र भूमीत रमलेही.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

भारतीय बैठक अन्‌ पिठलं- भाकरीचा मेनू

"मी अभाविपचा शहराध्यक्ष असताना ते व्याख्यानमालेसाठी येथे आले. बालगंधर्व नाट्यगृहातील त्या चार-पाच दिवसांच्या मालिकेत ते रोज व्याख्यानाच्या पाच मिनिटे आधी व्यासपीठावर असत. या वेळी त्यांना घरी भोजनासाठी आग्रह धरला असता, त्यांनी भारतीय बैठक व पिठलं- भाकरीचे भोजन देण्याबाबत अट टाकून निमंत्रण स्वीकारले. १९९८ मध्ये अभाविपने जाणता राजाचे प्रयोग आयोजित केले असता, एका प्रयोगाच्या वेळी शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगात केलेल्या आतषबाजीने पडद्यामागे थोडी आग लागली. त्या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रयोग सुरू ठेवण्याची सूचना देत स्वत:च आग विझविण्याच्या कामी पुढाकार घेतला. त्यांच्यासारखा शिवशाहीर लाभणे हे महाराष्ट्राचे भाग्य, अशा समर्पित व्यक्तीस त्रिवार मुजरा."

-अनिल राव (अध्यक्ष, जळगाव जनता सह. बँक)

‘ते’ मंतरलेले दिवस...

"अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे, देशभर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरांत पोचविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अनंत उपकार महाराष्ट्रावर, देशावर आहेत. त्यांचे समर्पण आणि योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. जाणता राजा महानाट्यासारख्या प्रयोगाचे शिवधनुष्य पेलण्याचा दृढनिश्चय डॉ. अविनाश आचार्य यांच्या टीमने १९९८ मध्ये केला अन् जाणता राजाच्या आयोजनाच्या इतिहासातील सर्व विक्रम छोटे ठरले. त्यावेळी सुमारे १५ दिवस बाबासाहेबांचा मुक्काम जळगावात होता. दररोज सकाळी ते बैठका घेत असत, सर्वांना मार्गदर्शन करीत. विचारविनिमय करीत असत. आपले अनुभव सांगत असत. त्यांच्यासोबतच्या अनेक अमृतानुभवाचे संचित आज आमच्या सर्व टीमकडे आहे. मंतरलेले ते दिवस अविस्मरणीय आहेत."

-राजेंद्र नन्नवरे, सचिव, विवेकानंद प्रतिष्ठान

loading image
go to top