धुळे-चोपडा राज्य मागार्वरील अतिक्रमणे हटवली | Jalgaon 3 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे-चोपडा राज्य मागार्वरील अतिक्रमणे हटवली

जळगाव : धुळे-चोपडा राज्य मागार्वरील अतिक्रमणे हटवली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : धुळे-चोपडा राज्यमार्गावरील बसस्थानक परिसरातील २० अतिक्रमणे पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने काढल्याने काही प्रमाणात रस्ता मोकळा होऊन वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था झाली.

मुख्य रस्त्यालगत हॉटेलचालक व दुकानदारांनी किचन शेड, रसवंती यंत्र, टेबल, पत्र्याचे शेड, बाक आदींचे किमान दहा दहा फूट अतिक्रमण केले होते. त्यामुळे दुकानांवर येणारे ग्राहक रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत होते. काही वर्षांपासून ही समस्या होती. ४ ऑक्टोबरला नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी बेकायदेशीर होर्डिंग्ज, रस्त्यात लावलेले फलक, जाहिरात बोर्डवर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने बुधवारी (ता. १७) सकाळी अतिक्रमित शेड, फलक, दुकानांचे बोर्ड, होर्डिंग्ज यांच्यावर जेसीबी फिरवून रस्ता मोकळा केला.

हेही वाचा: सकाळ सोबत बोलूया; मानसिक स्वास्थ्यासाठी ११ हजार लोकांचा मुक्त संवाद

उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी, अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल, एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, सुनील हटकर, विलास बागूल, राजेंद्र कोठावदे यांनी ही कारवाई केली. पालिकेने १० नोव्हेंबरला डिजिटल बॅनर छपाई करणाऱ्यांना नोटिसा देऊन बॅनरवर परवानगी पावती क्रमांक, कालावधी व प्रकाशकाचे नाव छापावे आणि पालिकेने ठरवून दिलेल्या जागीच बॅनर लावावेत, असे आदेशात म्हटले होते.

मात्र तरीही इतरत्र बॅनर लागलेले होते व त्यावर कालावधी तथा पावती क्रमांक नव्हता. पालिका व पोलिसांनी नगराध्यक्षांची मागणी आणि पालिकेच्याच आदेशाचे काटेकोर पालन करावे आणि विद्रुपीकरण केल्याबद्दल डिफेसमेंट कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. एसटी बंदमुळे अवैध वाहतुकीच्या वाहनांची बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, त्यामुळे सामान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसत असून, अतिक्रमणधारकांवर कारवाईचे सातत्य प्रशासनाने ठेवावे, अशी सामान्यांची मागणी आहे.

loading image
go to top