SAKAL Ground Report : ‘एमपी’ही चांगले... पण, आम्ही इथेच सुखी; चोरवडमधील रहिवाशांची भावना

A plaque in the Madhya Pradesh border, just 300 meters from Chorwad village.
A plaque in the Madhya Pradesh border, just 300 meters from Chorwad village.esaka

रावेर (जि. जळगाव) : चोरवड (ता. रावेर) हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सरहद्दीवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचे गाव. चोरवडपासून अवघ्या ३०० मीटरवर मध्य प्रदेशची हद्द सुरू होते. बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्य मार्गावर हे गाव असल्याने प्राथमिक सुविधांच्या बाबतीत या गावात फारशा अडचणी नाहीत. मध्य प्रदेश शासनाच्या शेतीसाठी वीज, रस्ते आणि बाजारपेठ यांच्या सुविधा महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक चांगल्या असल्याची रहिवाशांची भावना आहे. मात्र महाराष्ट्रातच सुखी समाधानी असल्याची सीमावर्ती भागातील लोकांची भावना आहे.

मध्यप्रदेशशी रावेर तालुक्याची किमान १०० किलोमीटर सीमा जोडलेली आहे. ती तापी नदीपासून ते सातपुडा पर्वत भागातही पसरली आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाण्यासाठी रावेर तालुक्यातून किमान ८ मार्ग आहेत. गावरस्त्यांत चोरवड- लोणी, जिन्सी-सोलबर्डी, गारखेडा- धुपी, मोहगण - गरताड, निरुळ- बिरोदा, अटवाडा- शिरसोदा, दोधा- नाचनखेडा, पाल- गाडग्या आम या रस्त्यांचा समावेश आहे.

'आरटीओ बॅरिअर’साठी प्रसिद्ध

रावेर- बऱ्हाणपूर रस्त्यावर १३ किलोमीटर अंतरावर चोरवड हे गाव आहे. हे गाव तेथील ‘आरटीओ बॅरियर’साठी जास्त प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्यांना येथे थांबवून त्यांची तपासणी केली जाते आणि त्यांच्याकडून आवश्यक तो कर घेतला जातो. या आरटीओ बॅरियरच्या परिसरातच ९०० लोकसंख्या वस्तीचे हे गाव वसले आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय होती. त्या काळात बऱ्हाणपूर येथे जाणे किंवा मध्य प्रदेशात मुलगी देणे या भागातील लोक टाळत असत. मात्र आता स्थिती बदलली आहे.

वीजपुरवठा, रस्तेही सरस

मध्य प्रदेशात शेतातील वीज ट्रान्सफॉर्मर जळाला की तो तातडीने बदलून मिळतो. अगदी शेतातील वीज पंपाचा फ्युज उडाला तरीही तेथील वीज मंडळाचा वायरमन त्यासाठी तातडीने धावून येतो. महाराष्ट्रात मात्र ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर महिना पंधरा दिवस तो बदलून मिळत नाही. तेथील वीज महामंडळ वीज बिलाचे ऍडव्हान्स पैसे घेते मात्र शेतकऱ्यांना सुविधा ही तशा तत्पर दिल्या जातात. चोरवडसह रावेर तालुक्यातील निरुळ गावातील रस्ते, गटारी, पथदीप आदि सुविधांबद्दल ग्रामस्थांची फारशी तक्रार नाही.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

बऱ्हाणपूरची बाजारपेठ मोठी

या सीमावर्ती भागातील लोक बाजारपेठेत रावेरला येण्याऐवजी बऱ्हाणपूर येथे जाणे पसंत करतात. रावेरच्या तुलनेने बऱ्हाणपूर जवळ आहे आणि तेथील बाजारपेठ ही मोठी असल्याने वस्तूंच्या किमती कमी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र सगळ्या प्रकारच्या शासकीय कामांसाठी, दाखले, उतारे यासाठी ग्रामस्थांना रावेरलाच यावे लागते. शिक्षणासाठी मध्यप्रदेशात- बऱ्हाणपूर येथील नामांकित ३-४ शिक्षण संस्थांत तालुक्याच्या विविध सीमावर्ती भागातून किमान ३५० विद्यार्थी जातात. त्यांना ने आण करण्यासाठी तेथील शिक्षण संस्था त्यांच्या बसगाड्या पाठवितात. दुसरीकडे मध्यप्रदेशातील व्यापारी चोरट्या मार्गाने जीएसटी चुकवून त्यांचा माल विक्रीसाठी महाराष्र्टात आणतात. टॅक्स चुकविल्याने ते कमी दरात मालाची विक्री करतात यामुळे स्थानिक विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो.

"महाराष्ट्रापेक्षा मध्यप्रदेशात शेती विषयक योजना अधिक फायदेशीर आहेत हे खरे. पण आवश्यक त्या सर्वच मूलभूत गरजा महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात असल्याचा आनंद आणि अभिमान आहे."

- रमेश नगराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, चोरवड ता रावेर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com