
Rajya Natya Spardha : नवोदित नाट्यकलावंतांची धडपड मांडणारे ‘जुगाड’
नाट्य समीक्षण - सचिन चौगुले (असा लोगो करून वापरावा)
मराठी माणसाचे दोनच गोष्टींवर मनापासून प्रेम आहे, ते म्हणजे नाटक आणि राजकारण. मात्र गणित चुकते ते म्हणजे तो नाटकात राजकारण आणतो आणि राजकारणात नाटक करतो. मात्र या नाटकातील राजकारणामुळे नवोदित कलावंतांचा होणारा संभ्रम आणि नेमके काय करावे? हा त्यांच्यापुढे उभा राहिलेला प्रश्न. मग द्विधा मनःस्थितीत असलेले नवीन नाट्यकलावंत आपापल्या परीने नाटक करण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यातून कराव्या लागणाऱ्या तडजोडींना (आपल्या बोलीभाषेतील जुगाड) विशद करणारे ‘जुगाड’ हे प्रदीप भोईलिखित दिग्दर्शित व जळगावच्या संजीवनी फाउंडेशनने सादर केलेले नाटक. ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील हे प्रथम नाटक.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
उत्साहवर्धक आणि नवऊर्जेने भरलेल्या या नाटकाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना खळाळून हसवत रंग भरले. यात जळगावातील स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मींकडून मिळणाऱ्या वागणुकीवर भाष्य करणारा प्रसंग हुबेहुब वटवल्याने, अनेकांना गुदगुल्या करून गेले. लेखक म्हणून प्रदीप भोई यांनी एक वेगळा विषय मांडण्याचे केलेल्या धाडसाचे प्रथम कौतुक.
यात अभिनयाच्या बाजूचा विचार करता काव्य सादरीकरण करणाऱ्या विन्या (विनोद बनसोडे) भाव खाऊन गेला, तर प्रदीप भोई, राज अंभोरे, सुमीत राठोड, विनोद बनसोडे, मयूर पवार, रोहित जाधव, कल्याणी ताडगे, पूनम छडीकर, कोमल छडीकर, प्रांजल पंडित, ललित पुराणिक, उज्ज्वल कचरे, मयूर जोशी, खुशवंत मराठे, नितीन भालेराव, गोपाल जोशी, ओम सोनवणे, मुस्कान तडवी, रिया बनसोडे, संदीप मोरे यांनी आपापल्या परीने रंग भरतनाट्य पुढे नेले.
तांत्रिक बाजूत संचित सपकाळे (पार्श्व संगीत), कल्पेश नन्नावरे, अजय पाटील (प्रकाश योजना) ही नाट्यासाठी पोषक होती. विशाखा सपकाळे (रंगभूषा), ओम सोनवणे (वेशभूषा), रोहित अंभोरे यांचे नेपथ्यही नाट्यास पोषक होते.
एकूणच नाट्याचा विचार करता श्री. भोई यांनी लेखक, दिग्दर्शक व प्रमुख भूमिका असे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला. त्यात काहीअंशी ते दिग्दर्शकीय बाजू वगळता यशस्वी ठरतात. पहिल्या अंकाची लांबी जवळपास पावणेदोन तास झाल्याने, प्रयोगाची रंगत थोडी कमी झाली. दिग्दर्शक म्हणून प्रदीप भोई यांनी काही ठिकाणी कात्री लावणे आवश्यक होते.
नृत्याचा प्रभावी वापर व कलावंतांचा रंगमंचीय वावर, त्यांचे कम्पोझिशन्स यांचा विचार करता रंगमंचाचा केलेला पुरेपूर वापर प्रशंसनीय आहे. मात्र कलावंतांचे शब्दोच्चार व आवाज यावर मेहनत घेणे आवश्यक वाटते. कारण नाट्याची परिणामकारता वाढविण्यासाठी कलावंतांच्या अभिनयाबरोबरच आवाजालाही तेवढेच महत्त्व आहे.