
राज्य शासन व केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार पॅसेंजर गाड्याही सुरू करण्यात येणार आहेत. यात प्राधान्याने भुसावळ-देवळाली मेमू गाडी चालविण्यात येणार आहे.
भुसावळ : अर्थसंकल्पात भुसावळ विभागाला नव्याने काही मिळाले नसले तरी जुन्या प्रकल्पांना प्राध्यान्यक्रमाणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी सहाशे कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याने कामाला गती मिळणार आहे, तर मेमू कारशेडसाठी दुसऱ्यांदा निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
आवश्य वाचा- जळगावच्या तरूणाची झेप; शेतकरी कुटूंबातील 'राहुल' झाला असिस्टंट कमांडंट
दरम्यान, राज्य व केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर पॅसेंजर गाड्या व साधारण तिकिटांचे वितरण करण्यात येणार आहे. शिवाय पी. जे. गाडीच्या मलकापूरपर्यंत स्वतंत्र मार्ग अथवा जुन्याच मार्गावर विस्तार करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर विचार होत आहे. रेल्वे बोर्डाकडून पिंक बुक प्राप्त झाल्यानंतर डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पी.जे. गाडी ब्रॉडगेज
पाचोरा-जामनेर (पी-जे) दरम्यान नॅरोगेज रेल्वेलाइन ब्रॉडगेज करण्याच्या कामालाही गती मिळणार आहे. शिवाय जामनेर ते बोदवड व पुढे मलकापूरपर्यंत स्वतंत्र किंवा आहे त्याच मार्गावर नवीन रुळाचे विस्तारीकरण करण्यासंदर्भातील दोन्ही प्रस्ताव विचाराधीन आहेत. या मार्गावर जामनेर ते बोदवडपर्यंत नवीन मार्ग होणार असून, पुढील मार्गावरील पर्यायांचा शोध घेतला जाणार आहे.
आवर्जून वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता गिरीश महाजनांसंदर्भात करणार गौप्यस्पोट !
१२ मेमू उपलब्ध
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या बडनेरा, अमरावती-नरखेड मार्गावर धावणाऱ्या मेमू गाडीचे डबे ८ वरून १२ पर्यंत करण्याचे विचाराधीन आहे. पूर्वी विभागात चार मेमू कार्यान्वित होत्या. आता मात्र १२ मेमू आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार आहेत. राज्य शासन व केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार पॅसेंजर गाड्याही सुरू करण्यात येणार आहेत. यात प्राधान्याने भुसावळ-देवळाली मेमू गाडी चालविण्यात येणार आहे.
प्रवासी गाड्यांची गती वाढणार
कॉरिडॉर होणार असल्यामुळे भुसावळ विभागातील वाहतूक वाढणार आहे. त्याची गती सध्या प्रतितास ११० किलोमिटर असून, ती १३० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत व अधिक प्रवासी वाहतूक शक्य होणार असल्याचे श्री. गुप्ता यांनी सांगितले.
रेल निरची स्पष्टता नाही
भुसावळ औद्योगिक वसाहतीत रेल्वेच्या प्रस्तावित व रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रेल निर प्रकल्प आयआरसीटीअंतर्गत असल्याने त्याबाबत रेल्वे बोर्डाकडून अद्याप स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.
हेही वाचा- एकनाथ खडसेंनी रखडलेल्या कामाची पाहणी केली; आणि कामाला मुहूर्त गवसला !
रेल्वेमुळे अर्थव्यवस्थेला फायदा
रेल्वेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिवर्तन होत आहे. विकासात्मक कामे होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला फायदा होऊन रोजगार उपलब्ध होत आहे. शिवाय पार्सलची सुविधाही तत्काळ मिळत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
मेमू कारशेडसाठी पुन्हा निविदा
शहरात मेमू कारशेडला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. याबाबत यापूर्वी निविदाही काढण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यामुळे याबाबत पुन्हा निविदा काढण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल, तर बडनेरा येथील वर्कशेडचे काम या वर्षी पूर्ण होऊन ती कार्यान्वित होणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
संपादन- भूषण श्रीखंडे