अरे व्वा! भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातील गुन्हेगारांवर आता ड्रोनद्वारे वॉच 

चेतन चौधरी 
Friday, 25 December 2020

कोरोना पश्चात रेल्वे वाहतूक झाल्यानंतर गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर गर्दी विभागण्यासाठी देखील या ड्रोनचा वापर करण्यात येईल.

भुसावळ: रेल्वेच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यापासून ते गर्दीच्या वेळी अतिसंवेदनशील स्थानकांवर नजर ठेवण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. ड्रोनची तंत्रशुद्ध पद्धतीने हाताळणी करण्यासाठी मध्य रेल्वेतील रेल्वे सुरक्षा दलाच्या विभागाने प्रथमच ड्रोन पथकाची निर्मिती केली आहे. यासाठी निंजा सर्विलास ड्रोन कॅमेरा खरेदी करण्यात आला असून, याच्या हाताळणीचे प्रशिक्षण रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. 

येथील रेल्वे यार्डमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून मालगाड्या दाखल होतात. यामुळे मर्यादित मनुष्यबळासह मोठ्या जागेवर सुरक्षा राखताना जवानांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर विविध यंत्रणांकडून करण्यात येत आहे. रेल्वे स्थानके, यार्ड, कार्यशाळा या भागांत सुरक्षा राखण्यासाठी उच्च क्षमतेचा ड्रोन खरेदी करण्यात आला आहे. ड्रोनचा कौशल्याने वापर व्हावा, यासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यात ‘आरपीएफ’च्या जवानांचा समावेश आहे. या जवानांना ड्रोन उडविण्याचे, नियंत्रण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

रेल्वेच्या मालमत्तेवरील अतिक्रमणांचे मूल्यांकन करण्यासाठी मालमत्तांचे मॅपिंग करण्यासाठी याचा वापर करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी अवघड ठिकाणचे रेल्वे रूळ पाहणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येतो. कोरोना पश्चात रेल्वे वाहतूक झाल्यानंतर गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर गर्दी विभागण्यासाठी देखील या ड्रोनचा वापर करण्यात येईल, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. 

ड्रोनची वैशिष्ट्ये 
ड्रोन परिचालन क्षेत्र : दोन कि.मी. 
हवेत उड्डाण करण्याची क्षमता : २५ मिनिटे 
वजन उचलण्याची क्षमता : दोन किलोपर्यंत 
कॅमेरा दर्जा : १२८०x७२० पिक्सेल एचडी 
अन्य वैशिष्ट्ये : रिअल टाइम ट्रॅकिंग, स्वयंचलित सुरक्षा मोड 

चोरांवरही अंकुश 
रेल्वे यार्ड तसेच इतर प्रतिष्ठानांमध्ये चोरीच्या घटना वारंवार उघडकीस आलेल्या आहेत. यामुळे रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान तर होतेच शिवाय सुरक्षेचा प्रश्न देखील उभा ठाकला आहे. यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे निगराणी ठेवणे सोपे जाऊन चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे. 

विशेष पथकाची नियुक्ती 
मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता आणि रेल्वे सुरक्षा बलाचे मंडल सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव यांच्या प्रयत्नाने निंजा सर्विलास ड्रोन कॅमेरा हा रेल्वे सुरक्षा बल भुसावळ मंडळासाठी खरेदी करण्यात आला आहे. या ड्रोन कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सिंगल टच ऑपेरेशन, व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग ऑपरेशन, विशेष ठिकाणाहून सर्विलासची क्षमता आहे. या ड्रोन कॅमेऱ्याची दूरचे अंतर मध्ये दोन किलोमीटरपर्यंत केली जाऊ शकते आणि दोनशे मीटरपर्यंत उडू शकतो. यासाठी मध्ये रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांना तीन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचे उदघाटन मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

रेल्वे यार्डाची सुरक्षा 
भुसावळ येथे रेल्वेचे सर्वांत मोठे यार्ड आहे. या रेल्वे यार्ड परिसरात निगराणीसाठी ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग केला जाऊ शकेल. तसेच रेल्वेच्या महत्त्वपूर्ण ठिकाणांसाठी रेल्वे परिसरातील गर्दीवर निगराणीसाठी याचा उपयोग केला जाऊ शकेल.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: train station marathi news bhusawal spotted criminal wach drones