निशाणे जवळ दोन मोटार सायकलला अज्ञात वाहनाची धडक; तीन ठार तीन जखमी

दगडू पाटील
Wednesday, 2 December 2020

आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवर असलेले सहाही जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

धरणगाव : येथून जवळच असलेल्या निशाने फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर दोघांचा जळगावामधून येत असताना रस्त्यात मृत्यू झाला आहे. आता मृतांची संख्या तीन झाली आहे. उर्वरित तिघांवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन दुचाकींना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवर असलेले सहाही जण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यातील सुना मोहनलाल भिलाला (वय 23) या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर पिंकी मूहलाल भिलाला (वय 22, रा.मध्य प्रदेश), नारायण लालसिंग बारेला (वय 20,रा.साळवा), दिलीप बारेला (वय 25 रा.साळवा), भरत बारेला (रा. साळवा), संगीता सिताराम भिलाला (रा.मध्य प्रदेश) असे गंभीर जखमी झाले झाले होते.

यातील दोघांना जळगावला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या अपघातातील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. या घटनेबाबत सेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ सतत आरोग्य विभागाच्या संपर्कात होते. वेळोवेळी घटनेची माहिती प्रसार माध्यमांना श्री वाघ यांनी दिली. 

रस्त्यामुळे अपघात 

रस्त्याची दुरवस्था असल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही, असा आरोप जनतेने केला आहे.

धरणगाव उड्डाण पुलावर रस्ता रोको

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संतप्त आदिवासी बांधवांनी धरणगाव उड्डाणपुलावर रास्ता रोको केले. एकाच कुटुंबातील तीन जणांचा जीव रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेलेला आहे. याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल आदिवासी बांधव करीत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचना देऊन आणि मागणी करून देखील रस्त्याच्या दृष्टीकडे लक्ष दिले नाही. या रस्त्यावर होणारे अपघात सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे, असा आरोप देखील पाटील यांनी केला. 

धरणगाव चोपडा धरणगाव जळगाव या रस्त्यावर गेल्या महिन्याभरात पाच-सहा अपघात झाले आहेत. आजचे अपघात तीन आदिवासी बांधवांचा मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. यापूर्वी देखील जळगाव रस्त्यावरील जिनीग जवळ, पाटचारी जवळ झालेल्या अपघातात जीव गमवावा लागला आहे.  मात्र, या सर्व परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असून, या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे.

या विभागाच्या कार्यकारी अभियंता कंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील संपूर्ण जिल्हाभर फिरत असतात. मात्र स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था त्यांच्या नजरेस पडत नाही का? असा प्रश्न जानकीराम पाटील यांनी उपस्थित केला. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी देखील यावेळी संतप्त जमावाने केली. 

पोलिसांच्या मध्यस्थीने रास्तारोको सोडला

उड्डाण पुलावर रास्तारोको होत असताना पोलिस कर्मचारी त्याठिकाणी आले, आपण आपले म्हणणे पोलिस ठाण्यात येवून मांडावे अशी विनंती जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष जानकी राम पाटील यांच्यासह आंदोलन कर्त्याना केली. त्यामुळे सर्व आंदोलनकर्ते पोलिस ठाण्यात गेले. पोलिस निरीक्षक जयपाल मोरे यांना निवेदन देवून मृतांच्या वारसांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. 

तहसीलदार यांना निवेदन

तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निवेदन देवून मृतांच्या वारसांना तातडीने शासकीय मदत मिळावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. शिवाय जोपर्यंत मृतांच्या वारसांना शासकीय मदतीचा आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत मृतांचे प्रेत ताब्यात घेणार नाहीत, अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two motorcycles were hit by a vehicle near Nishane Fateh this morning