Latest Jalgaon News | यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळेच जळगावात ‘पाणीबाणी’; 6 दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

As the water supply was stopped for six days, it was time to supply water by tanker to the old Jalgaon area of ​​the city.

यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळेच जळगावात ‘पाणीबाणी’; 6 दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरळीत

जळगाव : यंत्रणांचा हलगर्जीपणा, आहे त्या व्यवस्थेवरच अवलंबून राहण्याची मानसिकता यामुळे जळगाव शहरात गेल्या चार दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. परिणामी, पाऊस बरसत असतानाही जळगावकरांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागले.

वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीत (केबल) बिघाड झाल्याने ही स्थिती उद्‌भवल्याचे सांगितले जात असले तरी अशा आपत्कालीन स्थितीत पर्यायी व्यवस्थाच शून्य असल्याचे समोर येऊन महापालिकेच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. (Water crisis in Jalgaon due to laxity of system Water supply smooth after 6 days Latest Jalgaon News)

जळगाव शहरात सोमवारनंतर तब्बल सहा दिवसांनी म्हणजे आज रविवारी (ता. १८) पाणीपुरवठा सुरु झाला. तब्बल सहा दिवस शहरात कुठल्याही भागात पाणीपुरवठा झाला नाही. वाघुर पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीत बिघाड झाल्यामुळे पंपिंग होऊ शकले नाही व नंतरच्या प्रक्रियेतील जलशुद्धीकरणही झाले नाही. त्यामुळे ही स्थिती उद्‌भवल्याचे सांगितले जाते.

बिघाड शोधायला लागला उशीर

मुळात या केबलमध्ये बिघाड झाला बुधवारी, तो लक्षात आला गुरुवारी. गुरुवारी दुपारी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर पाऊस सुरु झाला. जोरदार पावसाने कामात व्यत्यय येऊन दुरुस्तीचे काम शुक्रवारीही पूर्ण होऊ शकले नाही. हे काम शनिवारी पूर्ण झाले, त्यानंतर पाणी लिफ्टिंग व पुढची प्रक्रिया सुरु झाली. अखेर रविवारी पाणीपुरवठा सुरळीत झाला. म्हणजे, सोमवारी ज्या भागात पाणीपुरवठा झाला त्या भागात तब्बल सात दिवसांनी रविवारी पाणी आले

नागरिकांचे हाल

मुख्य जलवाहिनीत गळती, व्हॉल्व्ह गळती, जलवाहिनी फुटणे, वीजपुरवठा खंडित अशा अनेक कारणांमुळे बऱ्याचदा पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित होते. आधीच दोन दिवसांआड पाणीपुरवठा होता, त्यातही अनेकदा त्याची वेळ पाळली जात नाही. या वेळी मात्र महापालिकेने अशा कुठल्याही प्रकारच्या बिघाड, दुरुस्तीची सूचनाच जाहीर केली नाही. त्यामुळे नागरिकांचे या सहा-सात दिवसांत प्रचंड हाल झालेत. अनेकांनी पाण्याचे जार, टँकर मागवून वेळ भागवली.

हेही वाचा: अंबासनला अवैध गोवंश वाहतूक रोखली; 11 गोवंशाची मुक्तता

अनेक वर्षे जुनी केबल?

बुधवारी वाघुरच्या पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये बिघाड झाल्याचे समजले. मात्र, ही केबल अनेक वर्षे जुनी असून ती बदलण्याबाबत महावितरणने गेल्या वर्षीच महापालिकेस पत्र दिले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

पालिका प्रशासन उदासीन

पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्‍यक सेवेबाबत महापालिका प्रशासनाने कधीही योग्य ती काळजी घेतलेली दिसत नाही. पाण्याचा साठा असूनही केवळ नियोजनशून्य कारभार व कुचकामी यंत्रणेमुळे नागरिकांना रोज पाणी मिळू शकत नाही. बऱ्याचदा पिवळे व अशुद्ध पाण्याच्या तक्रारीही समोर येतात. पर्यायी व्यवस्था म्हणूनही मनपाकडे यंत्रणा नाही.

नगरसेवक ‘नॉट रिचेबल’

एकीकडे महापालिका यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शहरात ‘पाणी बाणी’ निर्माण झालेली असताना बहुतांश प्रभागातील नगरसेवक नॉट रिचेबल होते. अनेकांनी फोन बंद करुन ठेवलेत, तर अनेकांनी कॉल उचललेच नाहीत. काही नगरसेवकांनी मात्र पर्यायी व्यवस्था करण्यासंबंधी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

हेही वाचा: ‘PWD’च्या जाचाने ठेकेदार ‘बेजार’!; 2 वर्षांपासून देयके थकीत

Web Title: Water Crisis In Jalgaon Due To Laxity Of System Water Supply Smooth After 6 Days Latest Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..