अखेर सुप्रीम कॉलनीला मिळाले सुरळीत पाणी!

अखेर सुप्रीम कॉलनीला मिळाले सुरळीत पाणी!

जळगाव ः पाणी सर्वात महत्वाचा विषय आहे. तुम्ही मंत्री असताना चारीद्वारे पाणी देत होते आम्ही पाईपलाईनद्वारे देतो. आता जलजीवन मिशन योजना आलेली आहे. पाण्यासाठी जिल्ह्यातील ७०२ गावांसाठी पक्ष विरहित कृती आराखडा तयार केला असून पाणी देण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. महापौरांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे काम शक्य झाले. महापौरांचे आणि स्थानिक नगरसेवकांचे विशेष कौतुक करतो. १० कोटीबाबत आम्ही निर्णय घेतला आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पाणी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. 

जळगाव शहर महानगरपालिका अमृत अभियान अंतर्गत सुप्रीम कॉलनीत नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीष महाजन, महापौर भारती सोनवणे, आमदाक सुरेश राजुमामा भोळे,  आमदार लता सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, एमआयएम गटनेते रियाज बागवान, शिवसेना गटनेते अनंत जोशी, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, विद्युत विभाग सभापती गायत्री राणे, नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, आदी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. 


पाणी योजनांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद : आमदार महाजन
माजी मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, जळगाव शहराला जे पाणी मिळतेय ते पाणी देण्याचे काम जामनेर तालुक्यातून होतेय याचा आम्हाला आनंद आहे. आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. सर्व पदाधिकारी काम करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. कोरोना काळातील काम कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संकट पुन्हा गडद होत आहे, खाजगी रुग्णालये फुल झाली असून आपण काळजी घेणे गरजेचे झाले आहे. प्रत्येकाने सतर्कता बाळगावी असे आवाहन महाजन यांनी केले.

सतत पाठपुरावा केल्याचे सार्थक : महापौर
महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले की, तीन वर्षापूर्वी या परिसरात आलो असता काही नागरिकांनी आम्हाला पाण्याच्या समस्येबाबत सांगितले होते. महापौर पद मिळाल्यानंतर वर्षभर सतत यासाठी पाठपुरावा केल्यानेच आज ही योजना कार्यान्वित होणार आहे. सुप्रीम कॉलनीला आजवर कधीही सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही परंतु आता सर्वप्रथम अमृत योजनेचे पाणी सर्वप्रथम सुप्रीम कॉलनीला मिळणार आहे. आमच्या हातून आणखी एक चांगले काम झाले याचा आम्हाला अभिमान आहे. असे भारती सोनवणे म्हणाले. 

१५ किमी जलवाहिनीचे जाळे
अटल नवीकरण आणि शहरी परिवर्तन मिशन अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीसाठी १५ लक्ष लिटर्सची उंच पाण्याची टाकी, १५ लक्ष लिटर्सची भूमीगत पाणी साठवण टाकी, पंप घर, ३५ एचपीचे २ पंप, १ लाख ४० हजार लिटर प्रतितास विसर्ग क्षमता, परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी ११० मिमीच्या १२८२९ मीटर, १४० मिमीच्या १७०० मीटर, १८० मिमीच्या ६१९ मीटर, २२५ मिमीच्या ३०० मीटर अशा एकूण १५ हजार ४४८ मीटर जलवाहिन्या परिसरात टाकण्यात आल्या आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com