हतनूर जलाशयात जैवविविधतेचा अभ्यास; ३०९ प्रजातींची नोंद 

हतनूर जलाशयात जैवविविधतेचा अभ्यास; ३०९ प्रजातींची नोंद 

तांदलवाडी (ता. रावेर)  : चातक निसर्ग संवर्धन संस्था व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आशियाई पाणपक्षी गणना २०२१ चे आयोजन करण्यात आले होते सकाळी सातपासून सायंकाळी पाचपर्यंत दहा तास पक्षिनिरीक्षण करण्यात आले. या वेळी राज्यातून तसेच भारतातील विविध ठिकाणांतून सुमारे ५१ पक्षी अभ्यासकांनी हजेरी लावली. या मोहिमेत आतापर्यंत जलाशय परिसरात ३०९ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. 
मेहूण, चांगदेव, चिंचोल, खामखेडा, कोथळी, मानेगाव, टहाकळी, तांदलवाडी, मांगलवाडी व हतनूर धरण जलाशयाच्या २५ टक्के परिसरातील नदीपात्रात बोटींमध्ये भ्रमंती करून दुर्बिणी व कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने स्थलांतरीत देशी-विदेशी पक्ष्यांचा अभ्यास केला. 

आढळलेले पक्षी 
यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, लालसरी, थापाट्या, शेंडी बदक, नदीसुराय, छोटा शराटी, कृष्ण थिरथिरा, घोंगी, खंड्या, चातक यांसह काही आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकाग्रस्त झालेल्या प्रजातींचीसुद्धा नोंद ठेवण्यात आली. 

जलाशयाला रामसर दर्जाची प्रतीक्षा 
हतनूर जलाशय महत्त्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र (lBA) घोषित झाले असून येथे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हतनूर जलाशयाला 'रामसर'चा दर्जा देण्याची सूचना वनविभागाला केली आहे. मात्र, यास अजूनही मंजुरी न मिळाल्याने पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी यांना रामसरचा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, तसेच मोठा लालसरी बदकाला हतनूर जलाशयाचा मानपक्षी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. 

या पक्षीअभ्यासकांची हजेरी 
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, डॉ. अनुराधा राऊत, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, बालगृह अधीक्षक जयश्री पाटील, स्मिता पाटील, वन परिमंडळ अधिकारी ललित गवळी, मिलिंद जोशी, अनिल कोष्टी, किरण बाविस्कर, हेमराज पाटील, धनश्री जोशी, पद्मिनी पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव उदय चौधरी यांसह पक्षी अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पक्ष्यांची मांदियाळी 
येथून जवळच असलेल्या हतनूर जलाशयावर दरवर्षी हिवाळ्यात देशी-विदेशी पक्ष्यांची जणू शाळाच भरलेली असते. यंदाही युरोप, सैबेरिया, मंगोलिया, चीन, रशिया, पाकिस्तान व उत्तर भारत या भागातून हजारो पक्षी स्थलांतर करुन आलेले आहेत. 


चातक निसर्ग संवर्धन संस्था आणि वन विभागाकडून आशियाई पाणपक्षी गणनेचे छान आयोजन करण्यात आले. दुपारच्या सत्रात उपस्थित राहण्याची संधी मिळाली. दुर्मिळ झालेले पक्षीही पाहायला मिळाले. भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने हतनूर महत्त्वाचे केंद्र तयार होईल. रामसर दर्जा व पक्षी अभ्यासकांना सोयीसुविधा मिळण्यासाठी प्रयत्नशील राहील. 
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव 
 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com