Latest Marathi News| शहरातील रस्त्यातील 'खड्ड्यांचे' कधी होणार सीमोल्लघंन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon : शहरातील रस्त्यातील 'खड्ड्यांचे' कधी होणार सीमोल्लघंन?

जळगाव : विजयादशमीला सीमोल्लंघन करत समाजातील वाईट वृत्तींचा नाश करून चांगल्याची सुरवात केली जाते. जळगावकर अनेक वर्षांपासून रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. कोट्यवधींचा निधी आहे, त्याला मंजुरी आहे; परंतु रस्ते काही तयार होत नाहीत. त्यामुळे या विजयादशमीला तरी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मक्तेदार यांच्याकडून शहरातील ‘खड्ड्यां’ सीमोल्लघंन होईल अशीच जनतेकडून अपेक्षा आहे.

शहरातील खड्डे बुजविले जात नाहीत, मात्र त्याच्यासाठी मिळालेला निधी उडविला जात आहे. त्याचाही मेळ आता जमेना, त्यामुळे सध्या मंत्रालयापासून तर महापालिकेपर्यंत पत्रांचाच खेळ सुरू आहे.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत एखादी ‘टीव्ही’वरील चांगली मालिका होऊ शकते अशी व्यथा झाली आहे. अगदी महापालिका निवडणुकीतील मंत्र्यांनी दिलेल्या शहरातील रस्ते गुळगुळीत होण्याच्या आश्‍वासनापासून तर मुख्यमंत्र्यांनी रस्त्यासाठी दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या आलेल्या ४२ कोटींच्या निधीपर्यंत कहाणी अनोखीच आहे.(when jalgaon city roads Repair public question to jalgaon muncipal coorporation Jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon Crime : अघोरी शक्तीची भिती घालून दाम्पत्याची 11 लाखात लूट

मात्र पुढे तर शहरातील ४९ रस्ते करायचे, त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले, त्यांनी मक्तेदार नियुक्त केले आणि मक्तेदाराला महापालिकेने दहा रस्त्यांच्या कामासाठी एनओसी द्यायची आणि ती दिल्यानंतरही त्याचे काम सुरू होण्यास अनेक अडचणी आल्या. त्यामुळे रस्त्याचे खड्डे बुजलेच नाहीत.

दहा रस्ते होत नाहीत, ३९ चे काय होणार?

शहरातील ४९ रस्त्यांचे डांबरीकरण करायचे आहे. मात्र दहा रस्त्यांच्या कामालाच विलंब होत आहे. त्यात अनेक अडचणी येत आहेत. मग ३९ रस्त्यांचे काम कसे होणार, हा प्रश्‍नच आहे. मंजूर असलेल्या दहा रस्त्यांपैकी तीन रस्त्यांची कामे सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र ते तरी पूर्ण होणार काय, असा प्रश्‍न आहे, तर उर्वरित सात रस्त्यांचे काम कधी सुरू होणार याबाबत कुणीही खात्री देण्यास तयार नाही.

कोटीच्या निधीच्या पत्राचा मात्र खेळ

शहरातील रस्त्यांचे काम सुरू आहे, असा दावा केला जात आहे. मात्र त्याची पाहणी ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करतात, ना महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी, कोणालाच कामाच्या पाहणीसाठी वेळ नाही. मात्र दुसरीकडे पत्रांचा खेळ मात्र सुरू आहे. आम्ही तुम्हाला पाच कोटी दिले त्यातून काय काम केले याची माहिती द्या, असे महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची माहिती दिलीच नाही. आता शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेस पत्र दिले आहे, की शासनाने मंजूर केलेल्या शंभर कोटींपैकी ६२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. मात्र अद्याप प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही, असेही प्रशासनास कळविण्यात आले आहे. एकीकडे निधीबाबत पत्राचा खेळ सुरू आहे, तर दुसरीकडे रस्त्याची कामे अद्यापही होत नाहीत. जनता मात्र रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्रस्त आहे. त्यामुळे काय सुरू आहे हेच आता जनतेला कळेनासे झाले आहे.

हेही वाचा: Ayushman Bharat Scheme : आयुष्यमान भारत योजनेच्या E- Cardसाठी विशेष मोहीम