
Youtube पाहून तो घरातच छापायचा बनावट नोटा; हिंगणेच्या तरुणाचा प्रताप
पहूर (ता. जामनेर) : ‘यूट्यूब’वरील (Youtube) व्हिडिओ पाहून दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा छापणाऱ्या तरुणाला पहूर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २०) बेड्या घातल्या.
जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या हिंगणे बुद्रुक (ता. जामनेर) येथील उमेश चूडामण राजपूत (वय २२) या तरुणाने ‘यूट्यूब’वर व्हिडिओ पाहून मोबाईल आणि प्रिंटरच्या सहाय्याने दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा छापून व्यवहारात आणण्याचा उद्योग सुरू केला होता.
हेही वाचा: मित्राच्या मदतीने ST कर्मचाऱ्यानेच केली डिझेलची चोरी!
सुमारे सात ते आठ महिन्यांपासून सुरू झालेल्या त्याच्या या उद्योगाविषयी त्याने कोणालाही काही समजू दिले नाही. नोटा छापणे आणि बाजारात त्या चलनात आणणे असाच जणू त्याने धडाका लावला होता. पहूर बसस्थानकावर दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा व्यवहारात आणल्या जात असल्याची गुप्त माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर पोलिसांचा संशय बळावल्याने बाजारात फिरणाऱ्या उमेश राजपूतकडे पोलिसांनी विचारपूस केली. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ दोनशे रुपयांच्या तीन नोटा आढळल्या. त्यांपैकी एक नोट बनावट असल्याचे निष्पन्न होताच त्याला पोलिस ठाण्यात आणले.
पोलिसांना घरी पोचताच सापडले...
पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणे बुद्रुक येथील संशयित उमेश राजपूतच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात कॅनॉन कंपनीचे रंगीत प्रिंटर, २०० रुपयांच्या ४६ बनावट नोटा, कोरे कागद, कटर असे बनावट नोटा छापण्यासाठीचे आवश्यक साहित्य मिळून आले. पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे यांनी शुक्रवारी पहूर पोलिस ठाण्यात भेट देऊन जप्त केलेल्या नोटा आणि साहित्यांची पाहणी करीत या गुन्ह्यात दोषी असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. संशयित उमेशने आतापर्यंत किती बनावट नोटा चलनात आणल्या, छपाईसाठी त्याला कोणाकोणाची कशी मदत मिळाली याची पोलिस चौकशी करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रतापराव इंगळे, उपनिरीक्षक अमोल गर्जे, हवालदार विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर देशमुख, गोपाल माळी यांनी केली. दरम्यान, संशयित उमेश राजपूत याला जामनेर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हेही वाचा: वाहतूक पोलिसांना कंबरदुखी, गुडघेदुखी, फ्रोज शोल्डरचा त्रास
''ग्राहकांनी व्यवहार करताना नोटा व्यवस्थितपणे तपासून घ्याव्यात. नकली नोटांपासून सावध राहावे. नोटांसंदर्भात काही शंका आल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.'' - प्रतापराव इंगळे, पोलिस निरीक्षक, पहूर पोलिस ठाणे
Web Title: Young Man Print Fake Notes In Home From Watching Youtube Video Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..