esakal | शैक्षणिक दातृत्व स्वीकारून विद्येच्या देवतेची पूजा 

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक दातृत्व स्वीकारून विद्येच्या देवतेची पूजा 

गणेशोत्सवाचा उद्देशच मुळी समाजप्रबोधनाचा आहे. पण या उत्सवाला सध्या वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे. आमच्यासारखा गणेशोत्सव प्रत्येकाने साजरा करावा, अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून भारतातील एकही मुलगी किंवा मुलगा भुकेला आणि अशिक्षित राहणार नाही व या उत्सवातून खऱ्या अर्थाने विद्येच्या देवतेची पूजा होईल.
-गोकुळ आहेर, संस्थापक अध्यक्ष, माणुसकी बहुउद्देशीय संस्था, नाशिक

शैक्षणिक दातृत्व स्वीकारून विद्येच्या देवतेची पूजा 
sakal_logo
By
रोशन भामरे

तळवाडे दिगर - देव देवळात नसून तो दीनदुबळ्यांमध्ये वास करत असल्याचे अनेक संत सांगून केले. मात्र गणेशोत्सवाच्या नावाने लाखो रुपयांच्या देणग्या वसूल करून मोठमोठ्या मूर्तींमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न करतो. 

उत्सवाच्या नावाखाली ध्वनी व वायुप्रदूषण वाढवितो. मात्र या पारंपरिक गणेशोत्सवाला फाटा देत माणुसकी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ आहेर व त्यांच्या पत्नी मोनिका आहेर यांनी दीनदुबळ्यांमध्ये देव शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळ आहेर  मूळचे देवळ्याचे; परंतु कामानिमित्त ते नाशिकला स्थायिक झाले. गणेश चतुर्थीला श्री. आहेर रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांमध्ये गणपती शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा उद्देश एकच होता की ज्या गणेशाला आपण विद्येची देवता मानतो त्याच्या नावानेच आपण एखाद्या गरिबाचे शिक्षण करू शकतो. त्यामुळे नक्कीच त्या विद्येच्या देवतेला आनंद होईल. आपल्या घरातील गणपती कुठलाही नैवेद्य खाणार नाही. त्याऐवजी त्या मुलालाच नैवेद्य म्हणून गोडधोड खाऊ घातले तर अन्नाची नासाडी होऊन अपमानसुद्धा होणार नाही. शिवाय गणपती बाप्पाचे विसर्जन न केल्यास कुठलेही प्रदूषण होणार नाही. त्यांचा शोध थांबला तो जिल्हा रुग्णालयासमोर.

पूर्वी याच ठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल लागायचे व त्यांना याच ठिकाणी खराखरा गणेश सापडला. जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर राहणाऱ्या व भंगार गोळा करून पोटाची खळगी भरणाऱ्या परिवारातील सोमनाथ पवार या तीन वर्षांच्या मुलाला बाप्पा म्हणून त्यांनी घरी आणले. गणपती समजून त्याची पूजा केली. त्याला चांगले गोडधोड नैवेद्य खाऊ घातले. त्याच्यासाठी खेळणी, कपडे खरेदी केले. तसेच त्याला फिरायलादेखील घेऊन गेले. त्या गरीब मुलाला शिक्षणासाठी दत्तक घेतले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री. आहेर यांनी धार्मिक उत्सवाला सामाजिक उत्सवाची जोड दिली आहे. समाजकार्यात अग्रेसर असणारे आहेर जिल्हा रुग्णालयात रोटी बॅंक चालवत होते. त्याच वेळी ते सिग्नलवर भीक मागणाऱ्या गरिबांनादेखील पोळीभाजी पुरवत असत.  या सामाजिक दातृत्वामुळेच श्री. पवार यांनीदेखील आपल्या मुलाला श्री. आहेर यांच्या स्वाधीन सहजासहजी केले. आज पाच दिवसांसाठी का होईना सोमनाथ हा आहेर यांच्या ‘गोकुळा’त ‘माणुसकी’चे दर्शन घेत आहे.