Ganesh Festival : महिलाच करतात गणेशोत्सवाचे व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 September 2018

औरंगाबाद - गजानननगर, हडको येथील महिलांनी विविध जाती-धर्मांतील ३० ते ४० महिलांनी गणविश्‍व महिला गणेश मंडळाची स्थापना केली आहे. दहा वर्षांपासून हे मंडळ गणेशोत्सव साजरा करते. 

औरंगाबाद - गजानननगर, हडको येथील महिलांनी विविध जाती-धर्मांतील ३० ते ४० महिलांनी गणविश्‍व महिला गणेश मंडळाची स्थापना केली आहे. दहा वर्षांपासून हे मंडळ गणेशोत्सव साजरा करते. 

गुलालाऐवजी फुलांची उधळण, डीजेमुक्त मिरवणूक, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पारंपरिक नृत्य, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात गणेशाची स्थापना करण्यात आली. दहा दिवसांत समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल राहणार आहे. त्याचबरोबर व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला-हस्तकला स्पर्धा घेण्यात येतील. गणेशोत्सवात उधळण्यात येणारा गुलाल, विजेचा गैरवापर, कर्णकर्कश डीजेचा आवाज, ध्वनी, वायू व पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण यावर आळा घालण्यासाठी आणि गणेशोत्सवात होणारे गैरवर्तन टाळण्यासाठी अशा उत्सवात महिलांचा सहभाग असणे गरजेचे आहे. 

मंडळाचे संस्थापक कृष्णा बोरसे, संगीता बोरसे यांनी हडको येथील महिलांना एकत्र करून मंडळ स्थापन केले. या मंडळाची सूत्रे फक्त महिलांच्या हाती आहेत. विमल मुंडलिक, रंजना म्हस्के, कल्पना पाठक, मंगला खंडाळे, स्वाती मांजरे मंडळाचे व्यवस्थापन पाहतात.

आम्ही सर्व महिलांनी एकत्र येत अनावश्‍यक खर्चाला फाटा देत कमीतकमी खर्चात पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना केली आहे. यंदा पर्यावरणाचे जतन करीत गणेशोत्सव साजरा करणार आहोत.
- छाया पाटील, अध्यक्ष

बेटी बचाव-बेटी पढाव, पर्यावरणाचे संरक्षण, सर्वधर्मसमभाव हे संदेश आमच्या गणेश मंडळातून देतो व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो.
- सविता पोतदार, उपाध्यक्ष

वेळात वेळ काढून प्रत्येक उत्सवात महिलांनी सहभागी व्हावे यासाठी महिला गणेश मंडळाची स्थापना केली. उत्सवाच्या नावाखाली होणारे प्रदूषण, गैरवर्तन टाळण्यासाठी महिलांचा सहभाग असणे गरजेचे आहे.
- कृष्णा बोरसे, संस्थापक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Ganeshotsav Management Women