बंधाऱ्यातील पाण्यावर एक केव्ही वीजनिर्मिती

नागेश पाटील
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

चिपळूण - सोनगाव (ता. खेड) येथे बंधारा बांधून अडविलेल्या पाण्याच्या आधारे एक केव्ही वीजनिर्मिती करणारा जलविद्युत प्रकल्प रॅलीज इंडिया लोटे व रोटरॅक्‍ट क्‍लब लोटे यांच्या सहयोगातून साकारला आहे. या प्रकल्पातून गावातील शाळा, मंदिर व एक रस्ता प्रकाशमान झाला आहे. ही वीज मोफत पुरविण्यात येते. बंधाऱ्यामुळे ३० एकर जमीन ओलिताखाली आली आहे. तर २५० शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. 

सोनगाव, ब्राह्मणवाडी येथे लघु जलविद्युत प्रकल्पासाठी रॅलीज इंडियाने सीएसआर निधीतून सढळ हस्ते मदत दिली. वीजनिर्मिती करता आवश्‍यक ते पाणी ओढ्यावर बंधारा बांधून मिळविण्यात आले. तीन फूट रुंद व ५० फूट लांबीच्या बंधाऱ्यात सुमारे अडीच लाख लिटरचा पाणीसाठा होण्यास मदत झाली. हे पाणी जलवाहिनीद्वारे विद्युत टर्बाइन रूमजवळ नेण्यात आले. त्यासाठी सुमारे ४५० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली.

सोनगाव-ब्राह्मणवाडीत रस्त्यावर यापूर्वी पथदीप नव्हते. या प्रकल्पामुळे वाडीतील रस्त्यावर नवीन ३० पथदीप उभारून त्यास वीजपुरवठा झाला. रस्ता तसेच मंदिर परिसरात देखील मोफत वीज उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांसाठी हा प्रकल्प लाभदायक ठरला आहे.
- नितीन खेराडे,
उपसरपंच, सोनगाव

या टर्बाइनद्वारे पाण्याच्या साह्याने विद्युत निर्मिती केली जाते. एमटेक असलेले रोटरॅक्‍ट क्‍लबचे अध्यक्ष विजय मोरे यांनी वीजनिर्मितीची संकल्पना मांडली. प्रकल्पाचे डिझाईनही त्यांनीच केले. बंधाऱ्यापासून ३० फूट खोल वीजनिर्मिती केंद्र उभारले आहे. ही वीज गावातील ३० पथदिव्यांना पुरवण्यात आली आहे. तसेच शाळेसह आणि मंदिर परिसरात या विजेचा उपयोग केला जात आहे. वीज निर्मितीनंतर वाहून जाणारे पाणी शेतीला दिले जाते. गावातील २५० शेतकऱ्यांना या पाण्याचा शेतीसाठी लाभ झाला.

ग्रामस्थांना या पाण्याचा वापर कपडे धुण्याकरीता करता यावा, यासाठी एक चौथरा देखील बांधण्यात आला आहे. सुमारे साडेचार लाखाचा खर्च झाला. कामाचे नियोजन रोटरॅक्‍ट क्‍लबचे विजय मोरे, संकेत चाळके आणि संकेत देवरूखकर व इतर सदस्यांनी केले. या प्रकल्प उभारणीत गावचे उपसरपंच नितीन खेराडे यांनी विशेष मेहनत घेतली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News 1 KV power Generation on small dam