आरे-वाकी-पिंपळवटची ओळख बंधाऱ्याचे गाव

आरे-वाकी-पिंपळवटची ओळख बंधाऱ्याचे गाव

गुहागर - आरे वाकी पिंपळवट गाव गेली तीन वर्ष जलसंवर्धनासाठी बंधारे अभियान राबवीत आहे. उत्स्फुर्त लोकसहभाग असेल तर मोठे काम देखील कसे सहज शक्‍य होते याचे उदाहरण या ग्रामस्थांनी सर्वांसमोर ठेवले आहे. गेली तीन वर्षे सातत्याने ६० पेक्षा जास्त बंधारे बांधणाऱ्या ग्रामस्थांनी यावर्षी ७५ बंधारे बांधण्याचा विक्रम केला आहे. 

आरे - वाकी - पिंपळवटमधील १५ पैकी १३ वाड्यांमध्ये सरासरी ५ ते ६ बंधारे लोकांनी बांधले आहेत. आरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, हेमचंद्र मोरे, मिलिंद पडवळ, सुधीर भोसले, श्रीकृष्ण परचुरे व गजानन कळझुणकर यांनी वैयक्तिक बंधारे बांधले. या बंधाऱ्यांमुळे गावातील ३५ विहिरींतील पाण्याची पातळी वाढली.

एक वर्ष ग्रामपंचायतीने रु. २५ हजार खर्च करून बंधाऱ्यांना लागणारे प्लास्टिक कापड पुरविले. त्यानंतर लोकसहभागातूनच बंधाऱ्यांसाठी आवश्‍यक खर्च करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. ७५ बंधारे बांधण्यासाठी प्रकाश सावंत, संदीप देवकर, साईनाथ कळझुणकर, ५ जि. प. शाळा यांनी बंधाऱ्यांसाठी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत व वेळ दिला. 

बंधारे बांधल्याने वाकी, पिंपळवट परिसरात काजूचे क्षेत्र ६७ हेक्‍टरने, तर भाजीपाल्याखालील क्षेत्र ७ एकरने वाढले. कारण त्याला बंधाऱ्यामुळे पाणी देणे शक्‍य झाले. भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. नागदेवाडी येथील नळपाणी योजनेचा पाणीसाठा वाढल्याने मे महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करणे ग्रामपंचायतीला शक्‍य झाले आहे. शासनाच्या फळबाग लागवडीतून गेल्यावर्षी काजू लागवड करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी काजू लागवडी अंतर्गत भाजीपाल्याचे आंतरपीक घेतले आहे. याआधी मेपर्यंत पाणी मिळत नसे. मात्र बंधाऱ्यानंतर बागायतदारांना शिंपण्यासाठी पाणीही उपलब्ध झाले. 

अधिकाऱ्यांकडून बंधारे, शेतीची पाहणी
गुहागर पंचायत समितीच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये आरे गावातील बंधाऱ्यांचा वाटा मोठा असतो. तसेच जलसंवर्धनातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण सुरू झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीप्रसाद मिश्रा, जिल्हा सहकारी अधिकारी, आयएएस अधिकारी अभिनव गोयल यांनी गावाला भेट देऊन बंधारे आणि शेतीची पाहणी केली.

तंत्रज्ञान वापरून उत्पन्न वाढते हे उघड सत्य आहे. आजवर आम्ही केवळ नाचणी करत होतो. बंधाऱ्यांमुळे बारमाही पाणी मिळाल्याने डोंगराळ व कातळाच्या जमिनीत सर्व पिके सेंद्रिय खतावर आम्ही घेऊ लागलो. त्याला बाजारपेठेत चांगला दर मिळत आहे. तीन महिन्यांत ६० ते ७० हजार उत्पन्न मला मिळाले. बारा महिने शेती केली तर हे उत्पन्न वाढू शकते.
- संजय गमरे,
शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com