मंदिरांमधील कोरीव लाकूड कामावर रुपेशचा ठसा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी - नवनिर्मितीचा ध्यास, काम करण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे केवळ स्वतःच्या  कल्पनाशक्तीच्या जोरावर लाकडावर कोरीव कामात विविध संकल्पना साधणारा कुर्णे (ता. लांजा) येथील रुपेश पांचाळ पुरातन मंदिरांना झळाळी आणणारा कलाकार ठरतो आहे. पावस, आडीवरे, कशेळी येथील मंदिरांसह ११ मंदिरांना त्याने नवा ‘लुक‘ दिला. 

रत्नागिरी - नवनिर्मितीचा ध्यास, काम करण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे केवळ स्वतःच्या  कल्पनाशक्तीच्या जोरावर लाकडावर कोरीव कामात विविध संकल्पना साधणारा कुर्णे (ता. लांजा) येथील रुपेश पांचाळ पुरातन मंदिरांना झळाळी आणणारा कलाकार ठरतो आहे. पावस, आडीवरे, कशेळी येथील मंदिरांसह ११ मंदिरांना त्याने नवा ‘लुक‘ दिला. 

छोट्या खेड्यात सुतारकामाचा पारंपारिक व्यवसाय करण्यापेक्षा काही वेगळे करण्याचा रुपेशचा ध्यास होता. वडिल गजानन पांचाळ यांच्याकडून त्यांने सुतारकामाचे धडे घेतले. शिक्षण पूर्ण करून पारंपारिक व्यवसाय सुतारकामात आगळे वेगळे करण्याचा त्याचा ध्यास होता. त्याला त्याचे भावोजी शामकुमार सुतार यांची साथ लाभली. धारतळेतील श्रीमहालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी मंदिर-आडीवरे, कनकादित्य मंदिर-कशेळी, लक्ष्मीनारायण मंदिर, नवलाई मंदिर, विठ्ठल मंदिर पावस अशा पुरातन मंदिरांचे रुपडे न बदलता  लाकडांवर कोरीव काम केले.

कनकादित्य मंदिर व महाकाली मंदिरातील त्याच्या कोरीव कामाचे कौतुक झाले.  धारतळेच्या श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या दरवाजाचे काम आले आणि त्याच्या भाग्याचा दरवाजा उघडला. त्यानंतर आडीवरेतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या मंदिराचा गाभाऱ्याचे काम मिळले. १८ कारागिर घेऊन त्याने हे शिवधनुष्य यशस्वीपणे उचलले. काम सुरु असतानाच कशेळी मंदिराचे विश्‍वस्त आप्पा होळकर यांची भेट झाली. रुपेशच्या टीमने केलेलं काम आवडले आणि त्याला कनकादित्य मंदिराचे काम मिळाले. 

पुरातन मंदिराचा बाज संभाळणे आवश्‍यक असते. रुपेशचे लाकडावरील कोरीवकाम पाहण्यासारखे असते. पारंपारिक काम करण्याची पद्धत बदलून सुतारकामाला पुन्हा उभारी व प्रतिष्ठा देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात रुपेश अग्रेसर आहे. हनुमान प्रतिष्ठान कुर्णेचा तो पदाधिकारी आहे. संस्कृती फाऊंडेशन लांजाचा तो संस्थापक सदस्य आहे. 

लाकडावर कोरीव काम साधणे हे सोपे नव्हे. जिद्द, चिकाटी आणि स्वतःची कल्पनाशक्ती यामुळे ते साध्य होते. फर्निचरमध्ये लाकडाव्यतिरिक्तही वापर होऊ लागल्याने या व्यवसायाला मरगळ आली आहे. भविष्यात  स्वतःच्या मालकीची वुड फर्निचर कंपनी सुरू करायची आहे. लवकरच तीन मोठ्या पुरातन मंदिरांची कामे सुरू करणार आहे.
- रुपेश पांचाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News Carpenter Rupesh Pancahl story