भाड्याने जमीन घेऊन फुलवला कलिंगडचा मळा

सिद्धेश परशेट्ये
बुधवार, 28 मार्च 2018

खेड - पारंपरिक शेतीला बगल देत चिंचघर येथील शेतकऱ्यांनी कलिंगडचे पीक घेत लाखो रुपयांचे उत्पन्न घेत तरुण पिढीसमोर एक पर्याय ठेवला आहे. खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेती केली जाते. चिंचघर-प्रभूवाडी येथील संजय सखाराम पायरे यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन कलिंगडचा मळा फुलवला आहे.

खेड - पारंपरिक शेतीला बगल देत चिंचघर येथील शेतकऱ्यांनी कलिंगडचे पीक घेत लाखो रुपयांचे उत्पन्न घेत तरुण पिढीसमोर एक पर्याय ठेवला आहे. खेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेती केली जाते. चिंचघर-प्रभूवाडी येथील संजय सखाराम पायरे यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन कलिंगडचा मळा फुलवला आहे. गेली १७ वर्षे ते याप्रकारे शेती करीत असून, त्याच्यासह त्यांचे सहकारी त्यांना मदत करीत आहेत. 

संजय पायरेंनी पुणे येथे नोकरी केली. तीन वर्षांनंतर गावी आल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांची जमीन डोंगरात असल्याने आंबा व काजूची कलमे लावली. गावातील नदीकाठची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी काका अनंत पायरे व मित्र रमेश हरावडे, चंद्रकांत कडू यांना सोबत घेतले. भेंडी, पावटा, मिरची, वांगी, गवार, तूर, काकडी, शिराळी, दुधी भोपळा आदी भाज्यांसोबत पालेभाज्यांचे उत्पादन घेतले. त्यांना कलिंगडचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळू लागले. त्यामुळे केवळ कलिंगडचे उत्पादन घेण्याचे ठरवले. अनेक अडचणींवर मात करीत गेली १७ वर्षे कलिंगडची शेती करीत आहेत.

यावर्षी त्यांनी १२ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन कलिंगड लागवड केली. त्यांना सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला. सहा एकरांत साडेचार लाखांची कमाई केली. त्यानंतर सद्यःस्थितीत सहा एकरांत कलिंगडे आकार घेत आहेत. परंतु  हवामानातील बदलामुळे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. गेली १७ वर्षे अडचणींवर कल्पकतेने मात केली आहे. मी शेती करत असताना अनेक अडचणींना समोरे जावे लागले. परंतु त्यावेळी आमदार संजय कदम यांनी वेळोवेळी मला मदत केली. तालुका कृषी विभागाचेही वेळोवेळी सहकार्य लाभले, अशी माहिती पायरे यांनी दिली. 

कोकणातील जमीन विकून शहराची वाट चोखाळण्यापेक्षा येथील तरुणांनी आपल्या जमिनीत आधुनिक शेती करून चांगले पैसे कमावणे आवश्‍यक आहे. परंतु, येथील युवक हे नोकरीसाठी मुंबई-पुण्याची वाट धरतात. त्यामुळे या युवकांनी आपल्या गावाकडे वळून शेतीतून स्वतःसह आपला गाव समृद्ध करता येऊ शकते.
- संजय पायरे, 

प्रगतिशील शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News watermelon cultivation on lease land