अधिकाऱ्यांनी लेखणीऐवजी हाती घेतले कुदळ, फावडी, घमेलं!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ लिपिकांपर्यंत सुमारे शंभरहून अधिक लोकांचे हात बंधाऱ्यात गुंतले होते. लेखणी घेऊन कार्यालयात काम करणारी हीच मंडळी आज हातात कुदळ, फावडी, घमेली घेऊन नदीपात्रात उतरली त्यामुळे दीड टीएमसी पाणी साचल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

रत्नागिरी - ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत जिल्हापरिषदेने मिरजोळे-पाडावेवाडी येथील नदीवर कच्चा बंधारा उभारला. अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ लिपिकांपर्यंत सुमारे शंभरहून अधिक लोकांचे हात बंधाऱ्यात गुंतले होते. लेखणी घेऊन कार्यालयात काम करणारी हीच मंडळी आज हातात कुदळ, फावडी, घमेली घेऊन नदीपात्रात उतरली त्यामुळे दीड टीएमसी पाणी साचल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये  यासाठी जिल्हापरिषद कृषी विभागाकडून कच्चे बंधारे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार मिरजोळे येथे बंधारा बांधला. त्यामुळे आजुबाजूची जमीन सिंचनाखाली येईल. जवळच्या विहिरींची पाणीपातळीही वाढेल.
- विश्‍वास सिद,
उप मुख्य कार्यकारी अधिकारी

दरवर्षी एका गावामध्ये जाऊन संपूर्ण जिल्हापरिषदेचे अधिकारी, कर्मचारी बंधारा बांधतात. गतवर्षी पोमेंडीत बंधारा बांधण्यात आला. जिल्हापरिषदेच्या विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी यावर्षी मिरजोळेत दाखल झाले. त्यांच्या मदतीला ग्रामस्थही होतेच. सरपंच गजानन गुरवही हजर होते. सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये दगड-माती भरुन त्या एकावर एक रचण्याचे काम वेगाने सुरु झाले. साडेआठ वाजता काम सुरु झाले. सर्व प्रशासन कामाला लागले. माती पिशव्यात भरुन त्या एकावर एक रचण्याचे काम गावातील जाणकार मंडळीनी केले.

शंभर ते दीडशे मीटर लांबीच्या नदीपात्रात बंधारा उभारण्यासाठी साडेतीन हजाराहून अधिक पिशव्या लागल्या. तीन थर उभे केल्यानंतर पात्रात पाणी साचू लागले आणि काम करण्याचा उत्साह आणखीनच वाढला. कडक इस्त्रीच्या कपड्यात जिल्हापरिषदेत येणारी अधिकारी मंडळी बिनधास्तपणे नदीपात्रात उतरली होती. त्यामुळे ग्रामस्थांनाही हुरूप आला होता. या प्रकारे जिल्ह्यात पाच हजारहून अधिक वनराई बंधारे बांधण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. आतापर्यंत साडेतीन हजार बंधारे बांधल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

पंचायत समिती उपसभापती सुनील नावले, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, ग्रामविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वास सिद, कृषी अधिकारी पी. एन. देशमुख, लेखाधिकारी मारुती कांबळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, जे. आर. शिंदे, शिवप्रसाद खोत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सरपंच गजानन गुरव, उपसरपंच महेश पाटील, सदस्य सौ. पूनम पाडावे यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News ZP officers social work