खडकाळ जमिनीवर बहरली द्राक्ष बाग

वसंत काळवणे 
गुरुवार, 15 मार्च 2018

शेततळे केल्याने मला पाण्याचे नियोजन करता आले. हक्‍काचे पाणी असल्यास कोणतेही पीक शेतकरी घेऊ शकतो. या भागात द्राक्ष लागवड करण्यास कोणीही तयार होताना दिसत नाही. मी द्राक्ष लागवडीबाबत नातेवाइकांकडून माहिती आणि मार्गदर्शन घेतले. त्यामुळे द्राक्ष बाग फुलविता आली आहे.  
- बाबासाहेब टकले, रोहिलागड, शेतकरी

रोहिलागड - अंबड तालुक्‍यातील रोहिलागड परिसरात डोंगराळ, खडकाळ, मुरमाड जमिनी यात नेमके कोणते पीक घ्यावे, हा प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना पडतो; मात्र येथील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत खडका जमिनीवरही द्राक्ष बाग फुलवून नंदनवन तयार केले आहे. यातून त्यास चांगले उत्पन्नही मिळत आहे. 

बाबासाहेब टकले यांना आपल्या खडकाळ जमिनीवर पारंपरिक शेतीला फाटा देत या जमिनीवर शेततळे करून द्राक्ष बाग फुलविली आणि त्यातून त्यांना भरघोस उत्पन्नदेखील मिळत आहे. त्यांना चार एकर जमीन असून सध्या त्यांनी आपल्या एक एकर जमिनीत द्राक्ष बाग लागवड केली; तसेच नियोजनबद्ध पद्धतीने शेती करून त्यातून जवळपास आठ टन द्राक्ष उत्पन्न मिळविले आहे. 

अजून चार ते पाच टन उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री केली. 

त्यातून त्यांना अडीच ते तीन लाख रुपये मिळाले असून, अजून दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. त्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात केली. चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवीत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी खडकाळ, मुरमाड, दगड असलेल्या जमिनीत द्राक्ष लागवड करून यश मिळविले आहे. त्यांचे गारपिटीमुळे कुठलेही नुकसान झाले नसल्याने निसर्गाचे जणू आभार मानले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer jalna grapes